मुंबई : बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवा पाहुणा ‘सुलतान’ (सी-१) या वाघाचे आगमन होणार आहे. सुलतान वाघ नर असून तो दोन वर्षांचा आहे. वाघाला आणण्यासाठीचे सर्व मार्ग मोकळे झाल्याचे उद्यान प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद म्हणाले, सुलतान हा नागपूरच्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात आहे. त्याच्या स्थलांतरासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांनी महाराष्ट्राच्या प्रधान मुख्य वन संरक्षक (मुख्य वन्यजीव रक्षक) यांना परवानगी दिली आहे. थंडी जाणवू लागल्यावर वन्यप्राण्यांना प्रवासादरम्यान समस्या कमी प्रमाणात उद्भवतात. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुलतानला उद्यानात आणले जाईल. सुलतान वाघ हा प्रजोत्पादनासाठी आणला जाणार असून तो पर्यटकांना दाखविला जाणार नाही. सध्या उद्यानात चार वाघिणी व एक वाघ आहे.व्याघ्र व सिंह विहाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी (अधीक्षक) विजय बारब्दे म्हणाले, सुलतान नागपूरच्या गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून या वाघाला रेस्क्यू करण्यात आले होते. सुलतानने दोन नागरिकांचा बळी घेतला, त्यामुळे त्याला वनविभागाने ताब्यात घेतले होते.
‘सुलतान’ नॅशनल पार्कमध्ये येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 01:17 IST