Join us  

सुलोचनादीदी अनंतात विलीन; शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 6:15 AM

शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रूपेरी पडद्यावरील साक्षात वात्सल्याची मूर्ती अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच सुलोचनादीदी यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुलोनादीदींचे रविवारी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांचे पार्थिव प्रभादेवी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होेते. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत राजकीय व कलाक्षेत्रातील काही मोजक्या व्यक्तींनी सुलोचना यांच्या घरी जाऊन त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार सदा सरवणकर, आदेश बांदेकर, मिलिंद नार्वेकर आदी मान्यवरांचा समावेश होता. सचिन पिळगावकर, महेश कोठारे, जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, प्रिया बेर्डे, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनीही सुलोचनादीदी यांचे अंत्यदर्शन घेतले.

त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत कन्या कांचन घाणेकर यांनी अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण केल्यानंतर विद्युतदाहिनीमध्ये सुलोचनादीदींना अग्नी देण्यात आला. तत्पूर्वी पोलिस जवानांनी २१ बंदुकीची सलामी दिली. त्यानंतर बिगुल वाजवून सुलोचनादीदींना अखेरची मानवंदना देण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, प्रमोद पवार, प्रसाद कांबळी, अजित भुरे, मनवा नाईक, अभिनय बेर्डे, अभिजित केळकर, दिग्दर्शक सतीश रणदिवे, निर्माते सचिन खानोलकर, लीला गांधी, सुषमा शिरोमणी, जीवनकला केळकर, चिन्मयी सुमीत, किशोर जाधव, किरण शांताराम आदी मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :सुलोचना दीदी