मुंबई : क्षयरोगामुळे त्रस्त असलेल्या एका रुग्णाने चाकूने गळा कापून घेऊन आत्महत्या करण्याची घटना रविवारी पहाटे सायन येथील सोमय्या रुग्णालयात घडली. विकी बाबू जाधव (वय २७) असे त्याचे नाव असून, या प्रकारामुळे रुग्णालयात काही काळ खळबळ उडाली. वडाळा परिसरात राहत असलेल्या विकीला गेल्या पाच वर्षांपासून क्षयरोग होता. त्यावर उपचार करूनदेखील बरा होत नसल्याने तो निराश होता. आजारामुळे प्रकृती खालावल्याने १७ मे रोजी त्याला सायनच्या सोमय्या रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी पहाटे वार्डमध्ये त्याच्या शेजारी झोपलेली आई व अन्य रुग्ण झोपेत असताना त्याने फळ कापण्याच्या चाकूने स्वत:चा गळा चिरला. त्यामुळे रक्तबंबाळ होऊन निपचित पडला. थोड्या वेळानंतर त्याच्या आईला जाग आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करीत डॉक्टरांना बोलाविले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो उपचार सुरू असताना मृत पावला. डॉक्टरांनी तत्काळ ही माहिती वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)
रुग्णाची गळा कापून आत्महत्या
By admin | Updated: May 23, 2016 04:22 IST