Join us  

गोखले-बर्फीवाला पूल जोडण्यासाठी उपाय सुचवा, पालिका आयुक्तांचे ‘व्हीजेटीआय’ला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:51 AM

अंधेरीतील गोखले पुलाची उंची वाढल्याने झालेला घोळ निस्तरण्यासाठी मुंबई महापालिकेने व्हीजेटीआयला साकडे घातले आहे.

मुंबई : अंधेरीतील गोखले पुलाची उंची वाढल्याने झालेला घोळ निस्तरण्यासाठी मुंबई महापालिकेने व्हीजेटीआयला साकडे घातले आहे. गोखले पूल, बर्फीवाला पूल जोडण्यासाठी आवश्यक ते उपाय सुचविण्यासाठी सर्वेक्षण करावे, अशी विनंती पालिकेने संस्थेला पत्र लिहून केली आहे. 

जानेवारीत गोखले पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली. हा पूल बर्फीवाला पुलाला जोडणे अपेक्षित होते. त्यामुळे एस. व्ही. रोडवरील वाहतूककोंडी टाळून पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रवेश करणे सुलभ होणार होते. मात्र, पुलाची मार्गिका सुरू झाल्यानंतर पुलाची उंची काही मीटरने वाढल्याचे स्पष्ट झाले.

१) या पुलावरून बर्फीवाला पुलावर जाणे अशक्य बनले आहे. साहजिकच मार्गिका सुरू होऊनही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

२) ही कोंडी फोडण्यासाठी बर्फीवाला पूल तोडून तो नव्याने बांधण्याचा पर्याय होता. त्यासाठी १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. हा पर्याय अव्यवहार्य असल्याने पालिकेने अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी व्हीजेटीआयची मदत घेतली जाणार आहे. 

३) हे दोन्ही पूल एकत्रित करण्यासाठी जे काही उपाय असतील ते सुचवा, त्यादृष्टीने सर्वेक्षण करा, बर्फीवाला पूल न तोडता काय तोडगा काढता येईल, हे सुचवा, अशी विनंती आयुक्तांनी संस्थेला केली आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका