अलिबाग : दिवाळी सणाच्या कालावधीत सरकारी कार्यालयांना सलग पाच दिवस सुट्या आल्याने सरकारी कर्मचा-यांची ख-या अर्थाने सुट्यांची दिवाळी साजरी होणार आहे. त्यामुळे काही काळ जनतेची कामे ठप्प राहण्याची शक्यता आहे.विधानसभेच्या निवडणुकांमुळे गेला महिनाभर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासन सेवेत असणाऱ्यांना कामाचा प्रचंड ताण होता. त्यामुळे त्यांना क्षणाचीही उसंत मिळत नव्हती. निवडणूक कालावधीत सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्व यंत्रणा निवडणुकीच्या कामाला जुंपली होती. सतत कामाचा ताण, वेळी अवेळी जेवण, जागरणाने सरकारी अधिकारी आणि कर्मचारी पुरते थकले होते.निवडणुका संपल्यानंतर लगेचच दिवाळी सणाची धूम सर्वत्र सुरु झाली आहे. यासाठी यंत्रणेला काही कालावधीसाठी सुटीची नितांत गरज असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. जिल्हाधिकारी यांनी बुधवार, २२ आॅक्टोबरला सुटी जाहीर केली. तसेच दिवाळीसाठी राज्य सरकारने आधीच गुरुवार, २३ आणि शुक्रवार, २४ आॅक्टोबरला सुटी जाहीर केली आहे आणि २५ आॅक्टोबरला शनिवार त्यानंतर २६ आॅक्टोबरला रविवार आहे. त्यामुळे सलग पाच दिवस सुटी आली असल्याने अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या परिवारासोबत सुट्या एन्जॉय करु शकणार आहेत. काही अधिकारी आणि कर्मचारी यांचा परिवार परजिल्ह्यात राहत असल्याने अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २१ आॅक्टोबरच्या संध्याकाळी आपले घर गाठण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले होते.परिवारासोबत सण साजरा करता येणार असल्याने कामाचा आलेला ताण दूर होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले. या सुटीमुळे आलेला शीण दूर करण्यास मदत होईल, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनीधी)
सुट्यांचा दिवाळी धमाका
By admin | Updated: October 22, 2014 22:34 IST