Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या वक्राकार कण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

By admin | Updated: August 24, 2015 02:02 IST

मुंबईत राहणाऱ्या १० वर्षीय भूमिकाचा उजवा खांदा थोडा वाकडा झाल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. काही दिवसांतच पाठीला कुबड येऊ लागले. वर्षभरात विविध अस्थितज्ज्ञांचे

मुंबई : मुंबईत राहणाऱ्या १० वर्षीय भूमिकाचा उजवा खांदा थोडा वाकडा झाल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. काही दिवसांतच पाठीला कुबड येऊ लागले. वर्षभरात विविध अस्थितज्ज्ञांचे उपचार घेतले, पण गुण येत नव्हता. एका वर्षानंतर तिच्या वक्राकार कण्यावर शस्त्रक्रिया करून तो सरळ करण्यात डॉक्टरांना यश आले. भूमिका रुग्णालयात आल्यावर तिच्या तपासण्या झाल्या. यानंतर तिला इडियोपॅथिक स्कोलोसिस झाल्याचे निदान झाले. भूमिकाच्या पाठीच्या कण्याला कुबड आल्याने तिच्या फासळ््यांनाही कुबड यायला लागले होते. वर्षभर उपचार न मिळाल्याने भूमिकाचा कणा ५२ अंशामध्ये वाकला होता. तिचा कणा सरळ करण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे स्पाइन सर्जन डॉ. अभय नेने यांनी सांगितले. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला भूमिकावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी पोस्टिरीयर ओन्ली तंत्राचा वापर करण्यात आला होता. यामध्ये पाठीच्या कण्याच्या मधोमध एक सरळ आणि लहान छेद देण्यात येतो. कण्याला सरळ होता यावे यासाठी तो सैल केला जातो. यानंतर स्क्रू वापरून पाठीचा कणा सरळ केला जातो. शस्त्रक्रियेनंतर भूमिकाला आलेल्या ५२ अंशांच्या बाकामध्ये ९० टक्क्यांनी फरक पडला आहे. कणा सरळ झाल्याने भूमिकाची उंची २ इंचाने वाढली आहे. सहा आठवड्यांनी भूमिकाची तपासणी करण्यात येईल. यानंतर सहा महिने आणि १ वर्षाने पुन्हा तपासण्या करण्यात येतील. पहिल्या काही महिन्यांत भूमिका काही उचलू शकत नाही. तिला खेळता येणार नाही. पण यानंतर ती सामान्य मुलांप्रमाणे खेळू शकले, आयुष्य जगू शकेल, असे डॉ. नेने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)