Join us
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांच्या बाळाची कोविडसह फुप्फुसातील ट्युमरशी यशस्वी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:06 IST

छातीतील १५ सें.मी. आकाराच्या ‘टेराटोमा’वर केली मातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अवघ्या सात महिन्यांच्या बाळाला कोविड संक्रमणाची ...

छातीतील १५ सें.मी. आकाराच्या ‘टेराटोमा’वर केली मात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अवघ्या सात महिन्यांच्या बाळाला कोविड संक्रमणाची लागण झाली हाेती. त्याच्या छातीमध्ये १५ सें.मी. आकाराचा दुर्मीळ ट्यूमर आढळून आला. या बाळावर परेल येथील वाडिया रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आल्याने त्याला नवे आयुष्य मिळाले आहे.

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील दाम्पत्याच्या घरात या बाळाचा जन्म झाला; यामुळे हे दाम्पत्य आनंदात हाेते. मात्र जेव्हा बाळ दोन महिन्यांचे झाले तेव्हा त्याचे सततचे रडणे, श्वासोच्छ्वासात अडचणी येणे, आदी समस्या बाळाला जाणवू लागल्या. त्याला दूधही पिता येईना. यामुळे बाळ अशक्त होऊ लागले. चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी वेगवेगळ्या स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेतला. डाॅक्टरांनी बाळाला ‘टेराटोमा’ नावाचा दुर्मीळ ट्युमर असल्याचे निदान केले. त्यानंतर बाळाच्या पालकांनी त्याला परळ येथील वाडिया रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

रुग्णालयाच्या प्रमुख बालरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितले, १५ एप्रिलला बाळाला रुग्णालयात दाखल केल्यावर तपासणीअंती या बाळाला ‘टेराटोमा’ नावाचा ट्युमर असल्याचे आढळून आले. सर्वांत प्रथम आम्ही बाळाची कोविड चाचणी केली ती सकारात्मक आल्यानंतर बाळाला आठ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले. त्यानंतर उपचाराअंती पुन्हा चाचणी केली असता ती नकारात्मक आली. तेव्हा त्या बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. बाळाची प्रकृती चांगली आहे.

* कोविडमुळे श्वास घेताना त्रास

बाळ श्वास घेण्यास घाबरत होते. आईचे दूध त्याला पिता येत नव्हते. सीटी स्कॅन चाचणीत असे दिसून आले की, बाळाची दोन्ही फुप्फुसे, हृदयाच्या काही भाग आणि शरीरातील सर्वांत मोठी धमनी या साऱ्यांवर ट्युमरमुळे गंभीर परिणाम झाला होता, असे डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितले; तर वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला सांगतात, या बाळाला असह्य वेदना होत होत्या. सर्वप्रथम त्याला कोविडमुक्त करणे गरजेचे हाेते; कारण कोविड संक्रमणामुळे हे बाळ श्वास घेऊ शकत नव्हते आणि त्यानंतर ट्युमर काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.

.....................................