Join us  

मुख्यमंत्र्यांच्या १४,८३८ शुभेच्छा संदेशांनी यशस्वी अर्जदार सुखावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 5:55 AM

सिडकोच्या घरांची सोडत : योजनेतील १४,८३८ लाभार्थींचे मोबाइलवरून केले अभिनंदन

कमलाकर कांबळे नवी मुंबई : सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील १४,८३८ घरांची मंगळवारी संगणकीय सोडत काढण्यात आली. सोडतीत क्रमांक लागलेल्या अर्जदारांत उत्साहाचे वातावरण होते. त्यात भर पडली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाची. मुख्यमंत्र्यांनी सोडतीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना मोबाइल संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे यशस्वी अर्जदार चांगलेच सुखावले आहेत.

सर्वांसाठी घर या धोरणाअंतर्गत सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही गृहयोजना जाहीर केली होती. १३ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले होते. या योजनेतील १४,८३८ घरांपैकी ५ हजार २६२ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आहेत, तर ९ हजार ५७६ सदनिका अल्प उत्पन्न घटकासाठी आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरे उभारण्यात येत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी यात अधिक लक्ष केंद्रित केले होते. त्यानुसार, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही योजना यशस्वी करण्यासाठी कंबर कसली होती़ या योजनेला अनपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने मुख्यमंत्र्यांनी सिडकोचे सुद्धा अभिनंदन केले आहे़ तसेच सोडतीत यशस्वी ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना त्यांनी मोबाइल संदेश पाठवून अभिनंदन केले. सिडकोने घेतलेल्या आॅनलाइन सोडतीमुळे आम्हाला सहज निकाल पाहता आला.विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा संदेशामुळे तर वेगळाच आनंद झाला, अशी प्रतिक्रिया तळोजा येथील गृहप्रकल्पात यशस्वी ठरलेल्या कविता सोमनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे, तर सोडतीत यशस्वी झाल्याचे सकाळीच आॅनलाइनवर समजले.तर संध्याकाळी मोबाइलवर मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छाचा संदेश आल्याचे तळोजा गृहप्रकल्पातील लाभार्थी विद्याधर पवार यांनी सांगितले. लाभार्थी ठरलेल्या अर्जदारांच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया असल्या तरी मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा संदेशामुळे यशस्वी अर्जदारांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.१४,८३८ ग्राहकांना पाठविले शुभेच्छा संदेशच्सोडतीची प्रक्रिया सुरू होताच जाहीर होणाऱ्या निकालाबरोबच मुख्यमंत्री कार्यालयातून संबंधितांना शुभेच्छांचे संदेश पाठविण्यात आले. अनेकांना तत्काळ तर काहींना संध्याकाळी हे संदेश प्राप्त झाले. बुधवारच्या दिवशीसुद्धा हे संदेश सुरूच होते. एकूणच दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांनी या योजनेत यशस्वी ठरलेल्या १४,८३८ अर्जदारांना संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबई