ठाणे : कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ राखण्यात शिवसेनेला यश आले. पहिल्या फेरीपासून शेवटची फेरीच नव्हे तर पोस्टल व्होटिंगमध्येही शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी आघाडी घेऊन भाजपाच्या संदीप लेले यांचा ५१ हजार ८६९ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात पंचरंगी लढत झाली तरी २००९ पेक्षा २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे यांना २६ हजार ८१४ अधिक मते पडली आहेत. या मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी वगळता इतर पक्षांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. विशेष म्हणजे २ हजार ४८६ मतदारांनी नोटाला पसंती दिली.या मतदारसंघातील ३ लाख ४७ हजार ३८२ मतदारांपैकी १ लाख ८४ हजार ३६६ जणांनी ११ उमेदवारांना मतदान केले होते. एकूण झालेल्या मतदानापैकी १ लाख ३१६ मते शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना मिळाले. भाजपाचे संदीप लेले यांना ४८ हजार ४४७, काँग्रेसचे मोहन गोस्वामी (तिवारी) यांना १७ हजार ८७३, मनसेच्या सेजल कदम यांना ८ हजार ५७८ तर राष्ट्रवादीच्या बिपिन महाले यांना ३ हजार ७१० मते पडली. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवसेनेचे शिंदे यांनी पहिल्या फेरीत १ हजार ५१९ मतांनी आघाडी घेतली. मात्र, शिंदे यांनंी पहिल्या फेरीत जी आघाडी घेतली, ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. विशेष म्हणजे या मतदारसंघात एकूण २२३ पोस्टल व्होटिंग झाले असून त्यापैकी १६८ मते शिंदे यांना पडली. येथेही त्यांना १३९ मतांची आघाडी मिळाल्याने विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. या मतदारसंघात शिंदे यांनी प्रत्येक पॉकेटमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवून दुसऱ्यांदा विजय संपादन केला. मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले असताना शिंदे यांना ७३ हजार ५०२ मते पडली. (प्रतिनिधी)
कोपरी-पाचपाखाडी राखण्यात शिवसेनेला यश
By admin | Updated: October 20, 2014 03:56 IST