Join us

रहिवाशांच्या लढ्याला यश, विकासकाने दिले थकीत भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुनर्विकास प्रकल्प राबवताना रहिवाशांना स्थलांतरित केल्यानंतर विकासकाने घरभाडे थकविण्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पुनर्विकास प्रकल्प राबवताना रहिवाशांना स्थलांतरित केल्यानंतर विकासकाने घरभाडे थकविण्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. विकासकाने रहिवाशांना अशा प्रकारे वेठीस धरल्यानंतर त्यांच्यापुढे अनेक समस्या उभ्या राहतात. गोरेगाव पूर्वच्या पांडुरंगवाडी येथील साफल्य आणि नारायण निवास या इमारतींच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांना भाडे देऊन स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र विकासकाने या इमारतींमधील रहिवाशांचे मागील दीड वर्षापासून भाडे थकविले होते. रहिवाशांनी याबाबत शासन दरबारी तसेच पोलिसांना तक्रार केल्यानंतर विकासकाने रहिवाशांचे थकीत भाडे दिले आहे.

विकासकाने रहिवाशांचे भाडे थकविल्यास त्याचा करार रद्द होऊ शकतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिला होता. या निर्णयामुळे नागरिकांना वेठीस धरणाऱ्या विकासकांना दणका मिळाला होता.

साफल्य आणि नारायण निवास इमारतीमधील रहिवाशांना विकासकाकडून मागील दीड वर्ष भाडे देण्यात येत नव्हते. त्यामुळे इमारतीतील इतर ठिकाणी भाड्याने वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी रहिवाशांच्या वतीने विकासकाकडे घरभाड्याची मागणी केली असता विकासकाकडूनही त्यांना उडवाउवीची उत्तरे देण्यात येत असल्याचे रहिवाशांच्या वतीने सांगण्यात आले.

याबाबत या इमारतीमधील रहिवासी प्रवीण नायक यांनी सांगितले की, मी शासन दरबारी तसेच पोलिसांना पत्रव्यवहार करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यासंदर्भात गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्याच्या मध्यस्थीने विकासक व रहिवाशांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत विकासकाने रहिवाशांच्या थकीत घरभाड्याच्या मागणीसह इतर तीन मागण्याही मान्य केल्या. तसेच विकासकाने या वेळी थकीत घरभाड्याचा धनादेशही सुपुर्द केला.

........................