Join us
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे व बोरिवली परिसरातून ५ अजगरांना वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:06 IST

मुंबई : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा साप मानवी वस्तीत प्रवेश करू लागले आहेत. मुंबईतील वांद्रे व बोरिवली परिसरात दोन ...

मुंबई : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा साप मानवी वस्तीत प्रवेश करू लागले आहेत. मुंबईतील वांद्रे व बोरिवली परिसरात दोन दिवसांमध्ये ५ अजगरांना वाचविण्यात यश आले आहे. अम्मा केअर फाऊंडेशन आणि प्लांट अँड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटीच्या स्वयंसेवकांनी ही कामगिरी केली आहे. गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास बोरिवली पश्चिमेच्या चिकूवाडी येथील विट्टी इंटरनॅशनल स्कूलच्या समोरील मैदानात स्थानिक रहिवाशांना अजगर आढळून आला. यावेळी सर्पमित्र सुनील गुप्ता यांनी या ५ फुटी अजगराची सुखरूप सुटका केली. वांद्रे पश्चिम येथील बांगडीवाला चाळ येथून गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता ७ फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्र सुष्मिता दिघे यांनी जीवदान दिले. बोरिवली पूर्वच्या हनुमान मंदिर दौलतनगरच्या मागे असलेल्या चाळीत एका घरात गुरुवारी एक अजगर शिरला होता. यावेळी दुपारी १ वाजता या ७ फूट लांबीच्या अजगराची सर्पमित्र आकाश पांड्या यांनी सुखरूप सुटका केली, तर मंगळवारी दुपारी २ वाजता बोरिवली पश्चिम येथील कोराकेद्रा मैदानात नागरिकांना ५ फुटी अजगर आढळून आला. या अजगराची सर्पमित्र सुनील गुप्ता यांनी सुखरूप सुटका केली. मंगळवारी बोरिवली पूर्व येथील हिंदू स्मशानभूमीजवळील संजयनगर येथे ७ फुटी अजगर नागरिकांना आढळला. या अजगराची सायंकाळी पाच वाजता सर्पमित्र आकाश पांड्या यांनी सुखरूप सुटका केली. या पाचही अजगरांची पशुवैद्य डॉ. मनीष पिंगळे यांनी तपासणी केल्यानंतर, मानद वन्यजीव वार्डन सुनीश सुब्रमण्यम आणि वन्यजीव कार्यकर्त्या निशा कुंजू यांच्या नेतृत्वात वन विभागाला माहिती देऊन निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले.