Join us  

कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 6:56 PM

Mumbai News: मुंबई उपनगर जिल्ह्यातील लसीकरणाचा उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आढावा घेतला. याबरोबरच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला.

मुंबई - कोविडच्या आपत्तीवर मात करण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यातील लसीकरणाचा उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आढावा घेतला. याबरोबरच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला. (Suburban Guardian Minister Aditya Thackeray took stock of Covid prevention measures)

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संबंधित उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 ठाकरे यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर त्याविरूद्ध लढण्यासाठी उपलब्ध असणारे बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधा यासंबंधी मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनेचा आढावा घेतला. सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हे शासनाचे लक्ष्य आहे. यात महिलांच्या लसीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. याबाबतही त्यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर व्हेक्टर बॉर्न डिसीजवर नियंत्रण मिळविण्याबाबत स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

मागील आठवड्यात फक्त महिलांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामाध्यमातून एका दिवसात मुंबईत १.२७ लाख महिलांचे लसीकरण करण्यात यश आले. याबद्दल संबंधित यंत्रणांचे अभिनंदन करून आदित्य ठाकरे म्हणाले, यापुढे लसीकरणाचा दुसरा डोस देण्याबाबतही योग्य नियोजन करावे. यामध्ये महिलांबरोबरच विद्यापीठांचे विद्यार्थी, कामावर जाणारे नागरिक यांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा. दुसरा डोस झाल्यानंतर ज्या इमारती, कार्यालये, गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल, त्या इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोडसह विशेष लोगो लावण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी मुंबई महानगरपालिकेला केली. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांबाबत माहिती दिली. 

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबई