Join us

प्रत्यारोपणासाठीचा प्रस्ताव सादर

By admin | Updated: November 28, 2015 01:50 IST

एखाद्या दुर्घटनेत हात कायमचा निकामी झालेल्या व्यक्तीवर अवयवाचे प्रत्यारोपण करणे केरळनंतर आता मुंबई महापालिकेच्या नायर, केईएम आणि सायन रुग्णालयात शक्य होणार आहे.

मुंबई : एखाद्या दुर्घटनेत हात कायमचा निकामी झालेल्या व्यक्तीवर अवयवाचे प्रत्यारोपण करणे केरळनंतर आता मुंबई महापालिकेच्या नायर, केईएम आणि सायन रुग्णालयात शक्य होणार आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची सज्जता केली असून, अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आला आहे. राष्ट्रीय अवयव दिनानिमित्त शुक्रवारी केईएम रुग्णालयात ‘हात प्रत्यारोपण’ या विषयासंबंधी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अपघात व अन्य दुर्घटनांमध्ये हात निकामी होणाऱ्यांना प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया सध्या भारतात केवळ केरळमधील कोचीन येथे होते. तेथे आठ महिन्यांपूर्वी देशातील अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया करणारे डॉ. सुब्रमण्यन अय्यर हे या परिसंवादासाठी उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, हात ४ ते ५ तासांच्या आत प्रत्यारोपित करणे गरजेचे आहे. हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पुढच्या काही दिवसांतच ती व्यक्ती हातांचा वापर सहजपणे करू शकते. पण, हाताला संवेदना येण्यासाठी एक वर्ष किंवा अधिक काळ जावा लागतो. महापालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयांत प्लॅस्टिक सर्जरी विभाग, अनेस्थेशिया विभाग आणि अन्य विभाग सक्षम आहेत. या रुग्णालयांमध्ये तुटलेला हात जोडण्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडतात. त्यामुळे हात प्रत्यारोपण करता येऊ शकते. यासाठीच हात प्रत्यारोपण करण्याची परवानगी मागितली असल्याचे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या प्रमुख डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले.दरम्यान, मृत व्यक्तीचे अवयवदान करताना पोलिसांची मदत लागते. पण, पोलिसांना माहिती नसल्यामुळे प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागतो. म्हणून राष्ट्रीय आरोग्य दिनानिमित्ताने मुंबईतील ३९२ पोलिसांची जनजागृती करण्यात आली. (प्रतिनिधी)