Join us

ओपन जीमचे प्रतिज्ञापत्र सादर करा

By admin | Updated: July 31, 2015 03:15 IST

मरिन ड्राइव्ह येथील ओपन जीममुळे राजकीय वातावरण तापले असतानाच उच्च न्यायालयाने गुरुवारी महापालिकेला या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

मुंबई : मरिन ड्राइव्ह येथील ओपन जीममुळे राजकीय वातावरण तापले असतानाच उच्च न्यायालयाने गुरुवारी महापालिकेला या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.या प्रकरणी विजय यादव यांनी जनहित याचिका केली आहे. मरिन ड्राइव्ह परिसराला हेरिटेज दर्जा आहे. किनारपट्टीजवळ बांधकाम उभारता येत नाही. असे असतानाही येथे ओपन जीम उभारण्यात आली आहे. याचे उद्घाटन शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर वादंग उठले. तसेच येथे जीम उभारण्यासाठी माजी खासदार मिलिंद देवरा यांनी परवानगी मागितली होती. तेव्हा याला नकार देण्यात आला होता. त्यामुळे ही जीम येथून हटवावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत ही सुनावणी ६ आॅगस्टपर्यंत तहकूब केली. (प्रतिनिधी)