लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची स्थापना करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. या प्रस्तावित महाविद्यालयासाठी पायाभूत सुविधा, विविध कामांचे टप्पे, अभ्यासक्रम आणि खर्चाबाबत अभ्यास समिती गठित करण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचारासाठी सुसज्ज असे मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय, मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी संगीताच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची निवड करून समितीची स्थापना करण्यात आली आहे. हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, यामध्ये उषा मंगेशकर, आदीनाथ मंगेशकर, शिवकुमार शर्मा, झाकीर हुसेन, सुरेश वाडकर, अजोय चक्रवर्ती, ए.आर. रहमान, शंकर महादेवन, मनोहर कुंटे, निलाद्री कुमार आणि प्रियंका खिमानी हे या समितीचे सदस्य आहेत, तर कला संचालक मयुरेश पै या समितीचे समन्वयक, सदस्य सचिव असतील. ही समिती अभ्यास करून शासनाला तीन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.