Join us  

पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी; २५ सप्टेंबरपर्यंत करता येणार प्रवेशपूर्व नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 4:56 AM

लॉकडाऊनमुळे यंदाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. अनेक विद्यार्थी मूळगावी असल्याने किंवा अन्य कारणांमुळे प्रवेश घेऊ शकले नाहीत.

मुंबई : पदवी प्रवेशासाठी अद्याप नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने आणखी एक संधी दिली आहे. आता २५ सप्टेंबर, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ते नोंदणी करू शकतील. या आधीची मुदत १० सप्टेंबरपर्यंत होती.लॉकडाऊनमुळे यंदाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. अनेक विद्यार्थी मूळगावी असल्याने किंवा अन्य कारणांमुळे प्रवेश घेऊ शकले नाहीत. समितीच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया आणखी एक महिना वाढवून घेण्याचे आश्वासन सिनेट बैठकीवेळी प्रशासनाने सदस्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत नोंदणी केल्यानंतर ज्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, त्याची गुणवत्ता यादी जाहीर होईल.त्यानंतर, विद्यार्थ्यांना प्रवेशाची पुढील कार्यवाही करता येईल. ज्यांनी या आधी नोंदणी केली होती मात्र, काही कारणामुळे प्रवेश घेऊ शकले नाहीत, त्यांना पुन्हा नोंदणी करावी लागेल.संभ्रम वाढला : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संचालनालयाने परिपत्रक काढून राज्यातील सर्व विद्यापीठांना पदवी प्रवेशाची प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी, शासनाकडून अद्याप न मिळालेल्या अंतिम सूचना लक्षात घेता ते निर्देश रद्द करण्यात आले. मात्र, शासन स्तरावरून निर्णय आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर, आता मुंबई विद्यापीठाकडून पुन्हा प्रवेशपूर्व नोंदणीची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आल्याने पदवी प्रवेशाच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. पदवी प्रवेशाची प्रक्रिया पुन्हा राबविली जाणार का? त्यासंबंधी अंतिम निर्णय कधी होणार? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ