Join us

विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या परस्परांशी संवाद साधून सोडवायला हव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्याचा कोरोना महामारीचा काळ हा खडतर आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी सैनिकासारखे युद्ध करून त्या समस्येतून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्याचा कोरोना महामारीचा काळ हा खडतर आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी सैनिकासारखे युद्ध करून त्या समस्येतून बाहेर पडणे गरजेचे आहे. या काळामध्ये विद्यार्थ्यांनी नेहमी प्रोत्साहनात्माक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. तसेच प्रेरकांच्या सहाय्याने कठीणकाळावर कशी मात करावी हेदेखील समजणे महत्त्वाचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या परस्परांशी संवाद साधून सोडवायला हव्यात, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन व्याख्यानात केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर समाजातील सर्वांनाच महामारीच्या या काळात कसे लढावे याबद्दल महाजन यांनी मार्गदर्शन केले. बारावीची आणि अन्य स्पर्धा परीक्षांचीही तयारी विद्यार्थ्यांना करावी लागत आहे. यावेळी अनेकांचा मानसिक गोंधळ असू शकतो. यासाठी अभ्यास कसा करावा, स्वतःचे तंत्र कसे ठरवावे आणि परीक्षागृहात जाण्यापूर्वी आणि गेल्यानंतर कसे निर्णय घ्यावेत, याबाबत त्यांनी विवेचन केले.

अभ्यास तंत्र, परीक्षागृहातील युद्ध अशा वेगळ्या विषयांवर बोलताना त्यांनी लष्करी जीवनातील काही अनुभव आणि तेथे शिकवले जाणारे तंत्र, तेथील व्याख्याने यांचीही माहिती दिली. यात ‘मेसेज टू गार्सिया’ काय होता, त्यातून काय लक्षात घ्यायला हवे, तेही सहजपणे आणि सुलभ भाषेत त्यांनी सांगितले.

अभ्यासाचे तंत्र म्हणजे पाहाणी आणि तीन प्रकारची ‘रिव्हिजन’ (फेरआढावा) परीक्षेपूर्वी करणे आवश्यक आहे. ती नेमकी कशी आणि कोणत्या पद्धतीने करावी, त्याचेही मार्गदर्शन त्यांनी केले. सर्वांनी जीवनभर स्वतःला विद्यार्थी समजावे आणि हे सर्व क्षेत्रात वावरणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. सध्याच्या स्थितीशी, संकटांना तोंड देऊन समर्थपणे त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन महत्त्वाचे असते. अशा प्रोत्साहनांमुळे आणि प्रेरणेमुळे काहीही साध्य करता येते, असे ते म्हणाले.

...................................