Join us

आदिवासी वस्तीगृहातच विद्यार्थ्यांचे कुपोषण

By admin | Updated: December 21, 2014 23:39 IST

आदिवासी मुला-मुलींच्या वसतीगृहातील सकस अन्न व इतर सोयीसुविधा पुरविण्यातबाबत डहाणू प्रकल्प अधिका-यांकडून आश्वासनाव्यतिरिक्त काहीच हाती पडत नसल्याच्या निषेधार्थ गेल्या आठवड्यात मुलांनी उपोषण सुरू केले

हितेन नाईक, पालघरआदिवासी मुला-मुलींच्या वसतीगृहातील सकस अन्न व इतर सोयीसुविधा पुरविण्यातबाबत डहाणू प्रकल्प अधिका-यांकडून आश्वासनाव्यतिरिक्त काहीच हाती पडत नसल्याच्या निषेधार्थ गेल्या आठवड्यात मुलांनी उपोषण सुरू केले होते. त्यात आजपासून मुलींनीही सहभाग घेतला आहे. उपोषण सोडण्यासाठी आश्वासनाची खैरात घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना मागच्या आश्वासनाचे काय झाले साहेब? असा प्रतिप्रश्न करीत मुलींनी त्यांची बोलतीच बंद करून टाकली.मुलींच्या वसतीगृहात ग्रामीण भागातून आलेल्या १०६ आदिवासी मुली, ८ वी पासून ते पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. या मुलींना सोयीसुविधा पुरविण्याबाबत अत्यंत हलगर्जीपणा होत असून त्यांच्या खोलीतील खिडक्यांच्या काचा फुटल्या असून त्यावर चादरी टाकाव्या लागत आहेत. शौचालयाजवळ दिव्यांची सोय नाही, दरवाजेही तुटले आहेत. शिकण्यासाठी बाहेर जाताना कोर्टासमोरील झोपटपट्टीतील मुले त्यांची छेडछाड करतात. निकृष्ट जेवणासह कमी शैक्षणिक भत्त्याची रक्कम रोखीने देऊन कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या जात असल्याचे मुलींनी लोकमतला सांगितले. डहाणूच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या कार्यालयाशेजारीच मुलांच्या वसतीगृहात नंदुरबार विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, इ. भागातून आलेले १७७ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.