Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: March 27, 2017 06:48 IST

महापालिका शाळेत सार्वजनिक शौचालयाच्या शेजारीच विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

मुंबई : महापालिका शाळेत सार्वजनिक शौचालयाच्या शेजारीच विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मालाडच्या मालवणी टाउनशिप मराठी शाळेच्या आवारात, पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हे शौचालय बांधण्यात आले आहे. याची गंभीर दखल घेत, हे शौचालय तातडीने बंद करण्यात यावे, असे आदेश  शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा  गुडेकर यांना प्रशासनाला दिले आहेत.शिक्षण समिती अध्यक्षांनी मालवणी टाउनशिप मराठी शाळेला भेट दिली असता, हा प्रकार निदर्शनास आला. येथे शौचालयाच्या शेजारीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सांडपाण्याचा निचरा व्हावा, अशीही व्यवस्था येथे केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी जेथे पाणी पितात, तेथे सांडपाणी तुंबले होते. या सांडपाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी जावे लागते. खुद्द अध्यक्षांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्वरित हे सार्वजनिक शौचालय बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले. शाळेच्या आवारात सार्वजनिक शौचालय बांधणे म्हणजे पालिका अधिनियमांचे उल्लंघन आहे, याचे स्मरण गुडेकर यांनी करून दिले.अचानक दिलेल्या भेटीमुळे हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सूत्र वेगाने हलली. विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळणे पालिकेचे कर्तव्य आहे. मात्र, अशा हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आहे, अशी नाराजी आरोग्य समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली. या पाहणी दौऱ्यात उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे व प्रशासकीय अधिकारी अशोक मिश्रा उपस्थित होते. (प्रतिनिधी)वळणई शाळेचे बांधकाम करा१मालाड मालवणी येथील पाडण्यात आलेल्या धोकादायक वळणई शाळेच्या इमारतीचे पुन्हा बांधकाम तातडीने करण्याचे आदेशही शिक्षण समिती अध्यक्ष गुडेकर यांनी दिले आहेत. २विद्यार्थ्यांना सध्या कांदिवलीच्या इराणेवाडीच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. इराणेवाडीच्या शाळेत जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी पालिका प्रशासनाला दिले.