मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीने भाडेतत्त्वावर दिलेल्या वरळीतील पालिका वसाहतीमधील बाल विकास शिक्षण सेवा संस्थेच्या प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. वारंवार पर्यायी जागेत शाळा स्थलांतरित करण्याची मागणी करूनही शिक्षण समिती दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालकांमधून होत आहे.संस्थेच्या प्राथमिक शाळेचे इंग्रजी माध्यमातील पाच वर्ग वरळीतील १०१ टेनामेंटमध्ये तळमजल्याला भरतात. त्यात पहिले ते सातवी कक्षेतील सकाळ व दुपार सत्रात मिळून सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वरळी, प्रभादेवी आणि दादर परिसरातील मुले या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शाळेतील वर्गांची जागा अपुरी पडत असल्याने शिक्षक व मुख्याध्यापकांना वर्गाबाहेरच खुर्ची आणि टेबल टाकून बसावे लागत आहे. तर विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने वर्ग फारच लहान असल्याने एका बाकावर सरासरी चार मुले बसत आहेत.वर्गांतील भिंतीची अवस्था बिकट असून कोणत्याही क्षणी स्लॅब कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्गांतील भिंतींना तडे गेले असून पावसाचे पाणी थेट वर्गात येते. मुलांच्या अंगावर पाणी पडू नये, म्हणून संस्थेने तात्पुरती सोय म्हणून वर्गात मेनकापडे लावली आहेत. तरी याबाबत वारंवार पालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुभाष देसाई यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
By admin | Updated: August 14, 2014 01:30 IST