Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उशिराच

By admin | Updated: June 9, 2014 01:54 IST

शिक्षण मंडळातील प्रशासन विरुद्ध सत्ताधारी यांच्यातील साठमारीमुळे मंडळाच्या शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हाती शालेय साहित्य पडणार आहे.

डोंबिवली : शिक्षण मंडळातील प्रशासन विरुद्ध सत्ताधारी यांच्यातील साठमारीमुळे मंडळाच्या शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हाती शालेय साहित्य पडणार आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी केला आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी अडीच कोेटींची तरतूद केली आहे. त्याची निविदा काढण्यात प्रशासन दिरंगाई करीत आहे. त्याचा फटका महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्यांच्या मुलांना सहन करावा लागणार आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षण मंडळाला बदनामी सहन करावी लागते. त्याला सदस्यांना तोंड द्यावे लागते. ही बदनामी रोखण्यासाठी प्रशासकावर कारवाई करण्याची गरज आहे. शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी सुरेश आवारी हे कोणत्याही विषयावर सदस्यांनी पाठपुरावा करूनदेखील त्याची दखल घेत नाहीत. त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांंच्या वतीने करण्यात येणार आहे. सत्ता शिवसेनेची असताना शिवसेनेचे सभापती शांताराम पवार व सभागृह नेते शिंदे यांच्यात शिक्षण मंडळाच्या कारभारावरून वाद आहे. यापूर्वीही त्यांचा वाद चव्हाट्यावर आला होता. या अंतर्गत राजकारणाचा फटका शालेय साहित्य खरेदीला बसला आहे. दरम्यान, राज्य सरकारने महापालिकेतील सर्व शिक्षण मंडळे बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला न्यायलयाने स्थगिती दिली आहे. तसेच आता अस्तित्वात असलेले मंडळ बरखास्त होणार नसून नव्याने येणाऱ्या मंडळास तो नियम लागू राहील, असे स्पष्ट असताना प्रशासकाकडून बरखास्तीचे कारण पुढे करून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार केला जात आहे. याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)