Join us

समिती ठरविणार विद्यार्थ्यांचा आहार

By admin | Updated: February 23, 2015 01:04 IST

शालेय पोषण आहार अर्थसंकल्पातून गायब झाल्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर विद्यार्थ्यांचा आहार ठरविण्यासाठी पालिका प्रशासनाने पाच सदस्य

मुंबई : शालेय पोषण आहार अर्थसंकल्पातून गायब झाल्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर विद्यार्थ्यांचा आहार ठरविण्यासाठी पालिका प्रशासनाने पाच सदस्य समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे सुगंधित दूध बंद झाल्यानंतर गेली दोन वर्षे चिक्की व दर्जेदार खिचडीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच पोषण आहार मिळण्याची चिन्हे आहेत़शिक्षण समितीच्या अर्थसंकल्पीय बैठकीत दहा तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे़ २००७ पासून पालिकेने सुगंधित दुधाचे वाटप सुरु केले़ परंतु दूधबाधाच्या घटना वारंवार घडत असल्याने अखेर ही योजना दोन वर्षांपूर्वी गुंडाळण्यात आली़ सध्या विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात येते़ मात्र बऱ्याच शाळांमध्ये निकृष्ट दर्जाची खिचडी मिळत असल्याची तक्रार आहे़ चिक्कीच्या नावाखाली गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानंच पुसण्यात आली आहेत़ याप्रकरणी शिक्षण समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले़ विद्यार्थ्यांना एकाचप्रकारचे अन्न खाऊन कंटाळा येतो़ त्यामुळे आठवड्यातून दोनवेळा खिचडी व अन्य दिवस दुसरा मेनू देण्याचा विचार सुरु असल्याचे, शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)