Join us

कँटिन बंद असल्याने विद्यार्थ्यांची होतेय उपासमार

By admin | Updated: February 3, 2015 23:04 IST

कर्जतच्या तासगावकर महाविद्यालयामधील कामगार वर्गाने पुकारलेल्या उपोषणाला महिना पूर्ण होत आला आहे.

कर्जत : कर्जतच्या तासगावकर महाविद्यालयामधील कामगार वर्गाने पुकारलेल्या उपोषणाला महिना पूर्ण होत आला आहे. त्यामुळे कामगारांची उपासमार सुरु असताना तिकडे विद्यार्थीदेखील कँटिन बंद असल्याने उपाशी राहू लागले आहेत. दरम्यान, संबंध महाविद्यालयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तासगावकर समूहाच्या सरस्वती शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालय ८ जानेवारी पासून बंद आहे. कामगारांना गेल्या सात ते नऊ महिन्यापांसून पगार नसल्याने ५ जानेवारीपासून साखळी उपोषण करीत आहेत. त्यामुळे कॉलेज बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. याचा परिणाम महाविद्यालयामधील होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला आहे. त्यांना खाण्यासाठी महाविद्यालयातील कँटिनमध्ये मिळत नसल्याने उपासमारीची वेळ त्या विद्यार्थ्यांवर आली आहे. ३१ जानेवारीपर्यंत कामगार वर्गाचे अर्धे पगार देतो, असे सांगणारे महाविद्यालयाचे व्यवस्थापन आहे कुठे, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित झाला आहे. कारण थकीत अर्धा पगार देण्याबाबत कोणतेही आश्वासन महाविद्यालय पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात महाविद्यालय सुरु होण्याविषयी आणि कामगार वर्गाच्या मनात पगाराविषयी धाकधूक वाढली आहे. विद्यापीठाने समिती पाठविण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मुंबई विद्यापीठाचे अभियांत्रिकी विभागाचे डीन डॉ. सुरेश उकारंडे महाविद्यालय व्यवस्थापनाची बाजू घेत त्या समितीला फिरकू दिले नसल्याचा आरोप कामगार प्रतिनिधी करीत आहेत. (वार्ताहर)