Join us

विद्यार्थिनीने ऑनलाइन दारूसाठी गमावले ६१ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 02:06 IST

तक्रारदार तरुणी केईएम रुग्णालय येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असून तेथीलच वसाहतीत राहण्यास आहे.

मुंबई : महापालिका रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या २५ वर्षीय विद्यार्थिनीने ऑनलाइन दारूसाठी ६१ हजार रुपये गमावल्याची घटना उघडकीस आली आहे. भोईवाडा पोलीस तपास करीत आहेत. तक्रारदार तरुणी केईएम रुग्णालय येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असून तेथीलच वसाहतीत राहण्यास आहे. ७ जून रोजी रात्री साडेसातच्या सुमारास गुगलवर वाईन शॉपबाबत माहिती बघत असताना एका शॉपचा क्रमांक मिळाला. तिने मैत्रिणीच्या क्रमांकावरून आॅर्डर दिली. त्याने होम डिलिव्हरीसाठी ‘गुगल पे’वरून दीड हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यासाठी त्याच मोबाइल क्रमांकावर यू.पी.आय. कोड पाठविला. तिनेही पैसे पाठविले. मात्र आॅर्डर न आल्याने अर्ध्या तासाने तिने याबाबत चौकशी केली. तेव्हा, संबंधित कॉलधारकाने त्यांना बिल जनरेट होत असल्याचे सांगून, पुन्हा कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगितले. तरुणीने पुन्हा तो कोड स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून १० हजार डेबिट झाले. याबाबत जाब विचारताच, तांत्रिक अडचणीमुळे पैसे गेल्याचे सांगून पुन्हा कोड स्कॅन करताच पैसे खात्यात जमा होतील, असे सांगून एकूण ६१ हजार रुपयांवर हात साफ केला.>आॅनलाइन व्यवहार करताना काळजी घ्याअनेक ठगांकड़ून अशा प्रकारे फसवणूक सुरू आहे. त्यामुळे आॅनलाइन व्यवहार करण्यापूर्वी योग्य खातरजमा करणे गरजेचे आहे. गुगलवरील विविध संस्थांसह वाईन शॉपच्या अधिकृत क्रमांकांमध्ये ठगाने आपला क्रमांक अ‍ॅड केला. मुंबई पोलिसांनी अशा बनावट क्रमांकांची एक यादीही जाहीर केली आहे.