मुंबई : रेल्वे अपघातात पाय गमावल्यानंतर चिमुरडी समृद्धी चालेल की नाही याची कोणाला शाश्वती नव्हती. मात्र वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देत आणि घरच्यांच्या सदिच्छांमुळे समृद्धीने कृत्रिम अवयवाद्वारे पहिले पाऊल टाकले. टिळक रुग्णालयातील तिसऱ्या वाढदिवशी समृद्धी नागटेने चिमुकली पावले टाकत रुग्णालय स्टाफला सुखद धक्का दिला. काही महिन्यांपूर्वी दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमधील अपघातात समृद्धीने पाय गमावला होता. त्यानंतर तीन महिने समृद्धीवर टिळक रुग्णालयात उपचार सुरू होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने टिळक रुग्णालयाकडूनच समृद्धीला कृत्रिम पाय लावण्यात आला. समृद्धी तीन वर्षांची झाल्याने तिला आता कल्याण येथील सेंट मेरी हायस्कूल येथे प्रवेश घेण्यात आला आहे. तिच्या प्रवेशासाठी आर्थिक मदत तसेच शैक्षणिक साहित्यही पुरवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी दिली. उपचारांदरम्यान लळा लावून गेलेल्या समृद्धीच्या वाढदिवसानिमित्त टिळक रुग्णालयाने खास कार्यक्रम केला. कृत्रिम पायाच्या आधारे समृद्धी अलगद पावले टाकत टिळक रुग्णालयात शिरताच रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट तसेच स्टाफने एकच जल्लोष केला. घरी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्यानंतर रुग्णालयात केक कापण्यासाठी जायचे आहे, असे समृद्धीला सांगताच ती लगेचच तयार झाल्याचे तिचे वडील जयराम नागटे यांनी सांगितले. मोठी बहीण जान्हवी (५) आणि तिच्या आत्यासह समृद्धी रुग्णालयात आली होती.
उमटली समृद्धीच्या जिद्दीची पावले
By admin | Updated: May 29, 2015 00:39 IST