Join us

एसटीच्या अधिकाऱ्यांची ‘झाडाझडती’

By admin | Updated: January 1, 2015 03:12 IST

परिवहन मंत्री म्हणून विराजमान झालेले दिवाकर रावते यांनी एसटीच्या मुंबईतील मुख्यालयात बुधवारी भेट दिली आणि एसटी अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली.

मुंबई : परिवहन मंत्री म्हणून विराजमान झालेले दिवाकर रावते यांनी एसटीच्या मुंबईतील मुख्यालयात बुधवारी भेट दिली आणि एसटी अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली. एसटीचा सध्या सुरू असलेला कारभार, कमी झालेले भारमान, नवीन सुविधांचा असलेला अभाव या सर्व मुद्यांवर चर्चा करतानाच एसटीच्या अधिकाऱ्यांची परिवहन मंत्र्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. त्याचप्रमाणे जुने संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून त्यांनी २२ जानेवारीपर्यंत कुठलेही निर्णय घेतल्यास त्याची अंमलबजावणी न करण्याचे आदेशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री दिवाकर रावते बुधवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत येणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परिवहन मंत्री एसटीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे समजताच सगळ्याच अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. मात्र त्यानंतर रावते हे दुपारी बारा वाजेपर्यंत येत असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे माहिती घेण्यास थोडा कालावधी मिळेल, असे वाटत असतानाच एसटीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील कामांची माहिती घेण्याचा वेग आणखी वाढविला आणि पुन्हा सगळ्यांची धावपळ सुरू झाली. दुपारी साडे बाराच्या सुमारास एसटीच्या मुख्यालयात प्रवेश करणाऱ्या रावते यांनी एक वाजता बैठक घेण्यास सुरुवात केली आणि दोन तास चाललेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. (प्रतिनिधी)भारमान वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच, कारभार पारदर्शक असावा, प्रवाशांच्या सोयी-सुविधांवर भर देतानाच नवीन सुविधा आतापर्यंत कुठल्या राबविण्यात आल्या याची माहिती रावते यांनी घेतली. एसटीच्या मराठी पाट्या लावण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांनी दिल्या.