Join us

पनवेलमधील सीएनजी पंपावर मारहाण

By admin | Updated: December 28, 2014 23:09 IST

पनवेलमधील स्थानिक व बाहेरील या वादावरून सीएनजी भरण्याच्या वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने सीएनजी पंप कर्मचा-याला रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

नवी मुंबई : पनवेलमधील स्थानिक व बाहेरील या वादावरून सीएनजी भरण्याच्या वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने सीएनजी पंप कर्मचा-याला रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. पनवेल शहर परिसरातील या सीएनजी पंपावर पनवेलसह आजूबाजूच्या परिसरातील रिक्षाचालक गॅस भरण्यासाठी येतात. याठिकाणी स्थानिक रिक्षावाल्यांची संख्या जास्त असल्यामुळे सकाळी ७ ते १० अशी वेळ स्थानिक रिक्षावाल्यांसाठी निश्चित करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्यावतीने दिलेल्या माहितीवरून (एमएच ०६ झेड ९७६) या रिक्षाचालकाने ठरलेली वेळ उलटून गेल्यानंतरही याठिकाणी गॅस भरण्याचा आग्रह केला. गॅस भरण्यासाठी असलेला कर्मचारी फिरोझ अबू बखर शेख (४०) याने रिक्षामध्ये गॅस भरण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या मारहाणीत कर्मचारी जबर जखमी झाला. त्याला त्वरित पनवेल ग्रामीण रुग्णालयात दाखल करून, त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आरोपी रिक्षाचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. काही दिवसापूर्वीच याठिकाणी मारहाणीची घटना घडली होती. (प्रतिनिधी)