Join us  

शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी

By रेश्मा शिवडेकर | Published: May 17, 2024 6:06 AM

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिला बचत गटाच्या लाभार्थींना गर्दी जमा करण्याचे काम सोपविण्यात आल्याचे दिसून येत आहे.

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रोख रक्कम देऊन जाहीर सभा, प्रचार यात्रांना गर्दी जमवण्याचा प्रकार राजकारणात नवीन नाही. चार तासांच्या प्रचारफेरीत सहभागी होण्याकरिता सध्या एका व्यक्तीला एक ते दीड हजार रुपये देण्यात येतात. परंतु, गर्दी जमा करण्याच्या या प्रकारात आता आणखी एका ट्रेंडची भर पडली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिला बचत गटाच्या लाभार्थींना गर्दी जमा करण्याचे काम सोपविण्यात आल्याचे दिसून येत आहे.

महिलांकरिता असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून अनेक महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करून निवडणुकीत गर्दीची तजवीज केल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर महापालिकेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या योजनांचाही वापर करून घेण्यात आला. अनेक ठिकाणी बचत गटांच्या महिलांचे महामेळावे भरवून गाजावाजा करून हा निधी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला होता. त्याची परतफेड सभांना गर्दी जमा करून केली जात आहे. मुंबईत प्रचारफेऱ्यांमध्ये सध्या  दिसणाऱ्या महिला याच बचत गटाच्या लाभार्थी असल्याची माहिती एका कार्यकर्त्याने दिली.

खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी

मुंबईत भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेची राजकीय अस्तित्त्वाची लढाई सुरू आहे. दुसरीकडे उद्धवसेनाही आपले मुंबईवरील वर्चस्व दाखवून देण्याकरिता इरेस पेटली आहे. या संघर्षात कट्टर शिवसैनिक नेमका कुठे, हे चित्र अजूनही स्पष्ट नाही. शिवसेनेच्या मतदारांची ही झाकली मूठ आपल्याच पारड्यात मते टाकणार, हे दाखवून देण्याकरिता मुंबईतील अनेक आमदार धडपडत आहेत. कारण, या भगव्या गर्दीवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. या शक्तिप्रदर्शनात या बचत गटाच्या महिलांचे अस्तित्व महत्त्वाचे ठरते आहे.

 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई