Join us
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या हत्येमागे अनोळखी व्यक्तीचा हात?

By admin | Updated: February 6, 2016 02:43 IST

पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या आशिष उमाशंकर गुप्ता (२२) या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

मुंबई : पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या आशिष उमाशंकर गुप्ता (२२) या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जोडप्याचा तरुणाच्या हत्येत सहभाग नसल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. दुसऱ्याच व्यक्तीने त्याची हत्या केल्याचा अंदाज दिंडोशी पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. आशिषचा मृत्यू हा अंतर्गत रक्तस्रावामुळे झाल्याचे त्याच्या शवविच्छेदन अहवालात उघड झाले होते. त्याच्या शरीरावर किरकोळ जखमाही होत्या. त्यानुसार त्याला कुणी तरी बेदम मारहाण केली असावी, हे उघड झाले होते. परंतु, आशिषच्या पालकांनी तो काम करत असलेल्या दुकानाच्या मालक आणि मालकिणीवर संशय घेतला. त्यानुसार पोलिसांनी मनोजकुमार रामप्यारे गुप्ता (४८) आणि त्याची पत्नी शिवकुमारी (४४) या दोघांना अटक केली.दोघांच्या चौकशीत या हत्येमध्ये त्यांचा काही संबंध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आशिष त्यांच्याकडे गेल्या सात वर्षांपासून काम करत आहे. इतक्या वर्षांत कधीही असा प्रकार घडला नाही. मात्र त्याला दारूचे व्यसन जडले होते. तशाच अवस्थेत तो रिक्षादेखील चालवायचा. त्या दरम्यान त्याचे कोणाशी भांडण झाले होते का, याची चौकशी आता दिंडोशी पोलीस करत आहेत. आशिष गेल्या महिन्यात १२ जानेवारीला अंधेरीच्या कूपर रुग्णालयात दाखल झाला होता. तीन दिवसांनी म्हणजे १५ जानेवारीला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.(प्रतिनिधी)