लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या संकटात मुंबई पोलीस जीव धोक्यात घालून कार्यरत होते. त्यांना कुटुंबीयांपासून लांब व्हावे लागले. याच काळात दमलेला बाबा जेव्हा घरी येतो तेव्हा, मुलांना वाटणारी भावना पोलीस पत्नीने कवितेतून मांडली. त्यांच्या मुलांनीही चित्रातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले शिवराज म्हेत्रे यांची पत्नी मीरा यांनी दमलेला बाबा जेव्हा घरी येतो ही कविता केली आहे. दादर पोलीस वसाहतीत म्हेत्रे हे पत्नी, दहा वर्षांची मुलगी सई आणि ५ वर्षांचा मुलगा साईराजसोबत राहतात. त्यांच्या कवितेत, बाबा घरी आले तरी मुलांना जवळ घेत नाही, कोरोना असेपर्यंत लांब रहा असे सांगतो. ''दमलेला पोलीस बाबा जेव्हा घरी येतो, लगेच आम्ही त्याला मिठी मारायला जातो, तो म्हणतो लगेच नका लावू हात जोपर्यंत आहे कोरोनाची साथ", यांसह पोलिसाला होणारा, त्रास, काळजी त्याची कर्तव्यनिष्ठा पाहून, पोलिसाची मुलगी असल्याचा अभिमान वाटत असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. कवितेतून मांडलेले चित्र सध्या सर्वच पोलिसांच्या घरात आहे.
वरळी, नायगाव आणि मरोळ या मोठ्या पोलीस वसाहतीसह मुंबईत ४६ पोलीस वसाहती आहेत. यात हजारो पोलीस कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी घरातील मंडळींचा विचार न करता ही मंडळी रस्त्यावर कार्यरत होती. कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी, नाकाबंदी, वाहन तपासणी, बंदोबस्त, त्यात कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कस्तुरबा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, चाचणीसाठी आलेल्या किंवा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या, नातेवाइकांची नोंदणी, रुग्णाचा मृत्यू झाल्यास पंचनाम्यापाूसन अंत्यविधींपर्यंतची जबाबदारी, विलगीकरण केंद्रांबाहेरील बंदोबस्त, होम क्वारंटाइनचे शिक्के असलेल्या व्यक्तीची माहिती घेणे, तसेच विविध बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर होती. अशात आपल्यामुळे कुटुंबीयांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून ते स्वतःच कुटुंबीयांपासून लांब राहत होते. अनलॉकच्या काळात पोलिसांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी कामाचे ओझे कायम आहे. त्यातही तक्रार न करता हा पोलीस कार्यरत आहे.
.......
...
पोलीस वसाहतीची दुरवस्था
पोलीस वसाहतीमध्ये जवळपास साडेअठरा हजार सदनिका असून, त्यापैकी साडेअकरा सदनिकांमध्ये पोलीस राहण्यास आहेत. त्यातही बऱ्याच पोलीस वसाहतीची दुरवस्था आहे.
.....
कधी १२, तर कधी २४ तास सेवा..
पोलिसांसाठी ८ तास सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र बऱ्याच ठिकाणी १२ तास सेवा सुरू आहे. त्यात पोलीस ठाण्यातील मनुष्यबळाच्या आधारावर आछ तास सेवा कायम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र पोलिसांना कधी १२, तर कधी २४ तासही पोलिसांना कार्यरत रहावे लागत आहे.
....
अनेकांना पोलीस वसाहतीचा आधार ...
पोलीस वसाहतीच्या दुरवस्थेमुळे आजही अनेकांची हक्काची घरे नाही. त्यामुळे त्यांना पोलीस वसाहतीचा आधार आहे, तर अनेक जण भाड्याच्या घरात राहण्यास आहेत. त्यात प्रशासनाकडून पोलिसांच्या हक्काच्या घरासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे घराचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात येत आहे.
...
तुटपुंज्या पगारात शिक्षणाचा भार...
अशात तुटपुंज्या पगारात घराच्या जबाबदारी बरोबरच मुलांच्या शिक्षणाचा खर्चही भागवावा
लागत आहे. पोलिसांकडून पोलिसांसाठी शक्य तेवढी मदत करण्यात येत आहे. तसेच मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पोलिसांच्या मुलांचा सत्कारही करण्यात येत आहे.
....