Join us

पनवेलमध्ये सखींनी घेतला ‘मनी प्लॅनिंग’चा कानमंत्र

By admin | Updated: July 27, 2015 23:37 IST

घराचा डोलारा सांभाळताना महिलांचे बचतीकडेही विशेष लक्ष असते. मात्र हे नियोजन करताना अनेकींना अडचणी येतात. या गुंतागुंतीतून बाहेर पडून चांगली गुंतवणूक करता यावी

कळंबोली : घराचा डोलारा सांभाळताना महिलांचे बचतीकडेही विशेष लक्ष असते. मात्र हे नियोजन करताना अनेकींना अडचणी येतात. या गुंतागुंतीतून बाहेर पडून चांगली गुंतवणूक करता यावी, यासाठी लोकमत सखी मंचतर्फे ‘मनीच्या गोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेलच्या खांदा वसाहतीतील श्रीकृपा हॉलमध्ये शनिवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रायोजक एनएसडीएल होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रसिध्द वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांनी ‘मनीच्या गोष्टी’ या विषयावर कथन केले. पैसा म्हणजे अर्थ आणि त्याच्याशी संबंधित आकडेमोड हा विषय क्लिष्ट असला तरी केळकर यांनी अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत या विषयाची माहिती उपस्थितांना करून दिली. चुटकुले, म्हणी, वाक्प्रचार आणि तज्ज्ञांचा अनुभव कथन करीत त्यांनी गुंतवणुकीचे कोडे सोडवले. घरात एक शिकलेली स्त्री असली की संपूर्ण कुटुंब शिकते, त्याप्रमाणे महिलांनी पैशाचे उत्तम नियोजन केले तर सगळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. पैशातून पैशाची वाढ करणे म्हणजे गुंतवणूक होय. त्याकरिता गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय निवडले पाहिजे, तळागाळातील प्रत्येक व्यक्तीचे बँकेत खाते असावे या उद्देशाने केंद्र सरकारने जन-धन योजना हाती घेतली आहे. ज्या घरात शांतता आणि प्रेम असते, त्याच ठिकाणी लक्ष्मीचा वास असल्याचे केळकर यांनी अखेरीस सांगितले. एनएसडीएलचे योगेश लाड यांनी गुंतवणूक नेमकी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. विमा, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड त्याचबरोबर एनएसडीएलच्या माध्यमातून २८२ ठिकाणी खाते उघडून पैसे ट्रान्सफर कसे करता येतात याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहा दांडेकर, गौरव दांडेकर यांनी बहारदार गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी नगराध्यक्षा चारुशीला घरत, लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, नगरसेविका नीता माळी, स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह सखी मंचच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.