Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत केबल टाकण्याचे काम थांबविले

By admin | Updated: May 15, 2014 00:23 IST

बोईसर पूर्वेकडील टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनीला गृहसंकुलाकरिता नेण्यात येणार्‍या ३३ के व्ही विद्युत केबल टाकण्याचे सुरू के लेले काम खैरापाड्याच्या ग्रामस्थांनी बुधवारी बंद पाडले.

बोईसर : बोईसर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळून बोईसर पूर्वेकडील टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनीला गृहसंकुलाकरिता नेण्यात येणार्‍या ३३ के व्ही विद्युत केबल टाकण्याचे सुरू के लेले काम खैरापाड्याच्या ग्रामस्थांनी बुधवारी बंद पाडले. केबलपासून नागरी जीवनाला असणार्‍या संभाव्य धोक्यामुळे तर उड्डाणपुलालगत केबल टाकणे धोकादायक असल्याने एमआयडीसीने काम थांबविले आहे. महाराष्टÑ राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या २२० के व्ही खैरापाडा बस स्टेशन ते बेटेगावस्थित महाराष्टÑ राज्य विद्युत कंपनीच्या नवीन ३३/११ के व्ही एस/स्टेशनला जोडणारी विद्युत केबल बोईसर पश्चिमेकडून पूर्वेकडे नेताना रेल्वे उड्डाणपुलाच्या जिन्यावरून अनधिकृतपणे मागील काही महिन्यापूर्वी टाकण्यात आली होती. परंतु ग्रामस्थांच्या विरोधामुळे त्या केबलचे काम थांबले होते. सकाळी प्रचंड पोलीस बंदोबस्तात एका जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होणार्‍या उड्डाणपुलालगतच खोदकाम सुरू केल्यानंतर भूमिसेनेचे अध्यक्ष काळूराम धोंदडे यांच्या नेतृत्वाखाली खैरापाड्याचे सरपंच शितल धोडी, उपसरपंच विवेक धोडी, सदस्य सखाराम धोडी, मिलिंद धोडी आणि ग्रामस्थांनी तेथे उपस्थित असलेली सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या बरोबर चर्चा करून काम बंद करण्याची विनंती केली. दरम्यान एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनीही काही आक्षेप घेतल्यानंतर अखेर दुपारनंतर काम थांबविण्यात आले आहे. त्यानंतर वातावरण शांत झाले. (वार्ताहर)