Join us

आरक्षणासाठी रास्ता रोको

By admin | Updated: August 15, 2014 01:45 IST

आरक्षणासाठी धनगर समाजाची संपूर्ण राज्यभर निदर्शने सुरु असताना गुरूवारी कळंबोली येथे धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केला

नवी मुंबई : आरक्षणासाठी धनगर समाजाची संपूर्ण राज्यभर निदर्शने सुरु असताना गुरूवारी कळंबोली येथे धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केला. यावेळी हजारोंच्या संख्येने पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांनी मुंबई-पुणे महामार्गावर कळंबोली येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती.धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी व राज्य शासनाने याबाबत केंद्राशी समन्वय साधून धनगर समाजाला त्वरित आरक्षणात सामील करावे, यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला होता. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा देखील समावेश होता. यावेळी बोलताना महाराष्ट्र धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य अशोक मोटे यांनी सांगितले, घटनेनुसार दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही आमची मुख्य मागणी असून आम्हाला (एस. टी.) आरक्षणानुसार सवलत देण्यात यावी, आम्ही या रास्ता रोको संदर्भात नवी मुंबई पोलीस उपायुक्तांना १ आॅगस्ट रोजी निवेदन दिले होते त्यानुसार आम्ही हे रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले. महाराष्ट्र धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य अशोक मोटे यांच्यासह गणेश बेरगळ, भगवान खताळ, आनंद अर्जुन, दत्ता ठोंबरे, गणेश बेरगल, रावसाहेब बुधे, रुपत माळवे आदीसह महिला पदाधिकारी उज्वला गलांडे, सुरेखा शेबडे, उषा कोडलकर आदींसह मोठ्यासंख्येने महिला उपस्थित होत्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी हे पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी उपस्थित होते. राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले. त्यामध्ये शेकापचे बाळाराम पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, मनसेचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. (प्रतिनिधी)