Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता रोको

By admin | Updated: January 18, 2015 23:10 IST

अपघातांचे सत्र थांबत नसल्याने संतप्त झालेल्या भिंगारी ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळी मुंबई- पुणे महामार्ग एक तास रोखून धरला.

पनवेल : अपघातांचे सत्र थांबत नसल्याने संतप्त झालेल्या भिंगारी ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळी मुंबई- पुणे महामार्ग एक तास रोखून धरला. जोपर्यंत गतिरोधक बसत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले, मात्र या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पनवेल शहराजवळून मुंबई- पुणे महामार्ग जात असून बाजूला अनेक गावे आहेत. दिवसभर कामाकरिता या परिसरातील ग्रामस्थांना महामार्ग ओलांडावा लागतो. मात्र दोनही बाजूने वेगाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना धोकादायक क्रॉसिंग करावी लागते. अशा प्रकारे लहान मोठे अपघात भिंगारी, काळुंद्रे आणि कोन गावच्या हद्दीत घडतात. १६ जानेवारी रोजी भिंगारी गावातील सहा वर्षांची विद्या रूपेश लोखंडे ही आत्याबरोबर महामार्ग ओलांडत होती. त्यावेळी एका वाहनाने तिला धडक दिल्याने त्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला तर आत्या गंभीर जखमी झाली. लोखंडे दाम्पत्याला भेटण्याकरिता नातेवाईक आज सायंकाळी भिंगारी येथे आली होती. तिला सुध्दा एका जीपने धडक दिल्याने गंभीर जखमी झाली.