Join us

‘सामना’चे प्रकाशन तीन दिवस थांबवा

By admin | Updated: February 16, 2017 05:30 IST

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदानापूर्वी ४८ तास राजकीय पक्षांच्या जाहिराती वा त्यांना फायदा होईल असा मजकूर

मुंबई : महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदानापूर्वी ४८ तास राजकीय पक्षांच्या जाहिराती वा त्यांना फायदा होईल असा मजकूर छापण्यास राज्य निवडणूक आयोगाने मनाई केलेली आहे. तरीही शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये शिवसेनेचा राजकीय फायदा होईल असा मजकूर छापला जात असल्याचा आरोप करीत १६, २० आणि २१ फेब्रुवारी असे तीन दिवस ‘सामना’च्या छपाईवर बंदी आणावी, अशी मागणी प्रदेश भाजपाच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी आज आयोगाकडे निवेदनाद्वारे केली. तसेच, आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल शिवसेना, सामनाचे संपादक यांच्यावर कारवाई करावी, संपूर्ण निवडणूक प्रचारकाळात सामनामध्ये शिवसेनेच्या प्रचारार्थ छापून आलेला मजकूर हा प्रचाराचाच भाग होता. छापलेला मजकूर हा एकप्रकारे प्रचाराचा व पर्यायाने जाहिरातीचा भाग असल्याने तो शिवसेनेने निवडणूक खर्चात जोडलेला आहे की नाही याची चौकशी करावी आणि जोडलेला नसेल तर तो पेड न्यूज समजण्यात यावा, असेही या निवेदनात म्हटले आहे. मतदानाच्या ४८ तास आधी प्रचारकी थाटाचा मजकूर वा जाहिराती न देण्याबाबत सप्टेंबरमध्ये आयोगाने घेतलेल्या बैठकीत एकमत झालेले होते. त्या वेळी शिवसेनेचेही प्रतिनिधी उपस्थित होते याची आठवण श्वेता शालिनी यांनी करून दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)