Join us  

शिवस्मारकासाठी पुन्हा घाई? मेटेंच्या हस्ते 20 डिसेंबरला भूमिपूजनाचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 10:32 AM

दोन महिन्यांपूर्वीच भूमिपूजन कार्यक्रमात झाला होता अपघात

मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी पुन्हा घाई केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी 20 डिसेंबरचा मुहूर्त शोधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दिवशी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच शिवस्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा भूमिपूजनासाठी घाई केली जात आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम 4 डिसेंबरलाच होणार होता. त्यासाठी मेटेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केली होती. मात्र इतक्या कमी कालावधीत भूमिपूजन कार्यक्रमाची तयारी होऊ शकत नसल्याचं अधिकाऱ्यांनी मेटेंना सांगितलं. यानंतर आता भूमिपूजनासाठी 20 डिसेंबरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. मात्र इतक्या कमी कालावधीत कार्यक्रमाची तयारी कशी पूर्ण होणार, हा प्रश्नच आहे. 24 ऑक्टोबरला शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी जाणाऱ्या एका बोटीला अपघात झाला होता. त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र अद्याप या अपघाताची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यातच आता पुन्हा एकदा शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी घाई केली जात असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. 

टॅग्स :शिवस्मारकविनायक मेटे