Join us

भांगेचा पाऊणे दोन कोटींचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2023 21:18 IST

उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाला नवीन पनवेल येथील सिडको कॉलनीत सेक्टर १३ मध्ये नीलम जनरल स्टोअर्समध्ये भांग मिश्रित पदार्थांची साठवून होत असल्याची खबर मिळाली होती

श्रीकांत जाधव

मुंबई - विविध ब्रँडच्या छोट्या मोठ्या प्लास्टिक पाऊचमधून भांग मिश्रित पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाने मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत १ कोटी ७३ लाख ९५ हजार ३७३ किंमतीचा मुद्देमाल ४ वाहनासह जप्त करण्यात आला आहे. 

उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाला नवीन पनवेल येथील सिडको कॉलनीत सेक्टर १३ मध्ये नीलम जनरल स्टोअर्समध्ये भांग मिश्रित पदार्थांची साठवून होत असल्याची खबर मिळाली होती. त्यावर भरारी पथकाने येथे छापा टाकला असता त्यांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी विशाल चौरसिया कडून २३४० कि. ग्रॅ. भांग मिश्रित पदार्थ जप्त केले. पुढे तपासात चौरसियाने दिलेल्या माहितीच्या आधारे भरारी पथकाने भिवंडी येथे मानकोली येथील में सेफ ट्रान्सपोर्ट कंपनीत छापा टाकला असता कंपनीने पोर्टलद्वारे पाठविलेल्या वाहनातून पुरवठा केला असल्याचे शोधून काढले. तसेच कंपनीच्या गोडावूनमध्ये शोध घेतला असता ७ हजार १३९. ४८ कि. ग्रॅ. भांग मिश्रित विविध ब्रँडच्या छोट्या मोठ्या प्लास्टिक पाऊच मध्ये आढळून आले. यासाठी वापरलेली चार वाहने आणि १ कोटी ७३ लाख ९५ हजार ३७३ किंमतीचा मुद्देमाल भरारी पथकाने जप्त केला आहे. तसेच में सेफ ट्रान्सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापक धर्मेंद्र शर्मा आणि  आरोपी विशाल चौरसिया नावा यांना अटक करण्यात आली आहे. 

या गुन्ह्याचा तपास निरीक्षक व्ही. के. थोरात व निरीक्षक आर. एम. खान यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक पी. जी. दाते करीत आहेत. या कारवाईत दुय्यम निरीक्षक योगेश पाडवे, जवान बी. ए. बोडरे, एस. व्ही. शिवापूरकर, ए. जाधव, पी. धवने, एस. राठोड, नंद  महाजन,  कीर्ती कुंभार यांनी कारवाईत प्रत्येक्ष भाग घेतला