मुंबई : महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकांत भाजपाची सरशी होणार असल्याचा निष्कर्ष मतदानोत्तर चाचण्यांनी काढल्यामुळे शेअर बाजारात पुन्हा तेजी परतली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 109 अंकांनी वाढून पुन्हा 26 हजारांचा टप्पा ओलांडून बंद झाला.
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार असले तरी, सरकारकडे राज्यसभेत बहुमत नाही. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभांत भाजपाला बहुमत मिळाल्यास राज्यसभेतही त्यांचे बहुमत होईल. याचाच परिणाम सरकारला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्यास आडकाठी राहणार नाही. त्यामुळे बाजारात उत्साह असल्याचे ब्रोकरांनी सांगितले. मुंबई शेअर बाजाराचा 30 कंपन्यांवर आधारित सेन्सेक्स 109.19 अंकांनी वाढून 26,108.53 अंकांवर बंद झाला. एका क्षणी तो 26,248.54 अंकांवर पोहोचला होता. त्या आधीच्या दोन सत्रंत सेन्सेक्सने 384.73 अंक गमावले होते.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 31.50 अंकांनी वाढून 7,779.70 अंकांवर बंद झाला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एलअँडटी, एसबीआय, महिंद्रा, अॅक्सिस बँक, हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांना चांगली वाढ मिळाली. टीसीएसच्या निकालांनी मात्र आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिला. टीसीएसने काल आपले तिमाही निकाल घोषित केल्यानंतर बाजार कमजोर झाला होता. टीसीएसचा शेअर 8.73 टक्क्यांनी कोसळला होता. अन्य आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. हाँगकाँग आणि सिंगापुरातील शेअर बाजार तेजीत होते, तर चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार कोसळले. (प्रतिनिधी)
च्सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 30 पैकी 21 कंपन्यांचे शेअर्स मजबूत झाले. भेल, हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, सिप्ला या कंपन्यांचा त्यात समावेश होता. याशिवाय एसबीआय, एलअँॅडटी, भारती एअरटेल, टाटा पॉवर, टाटा स्टील, एनटीपीसी, एचडीएफसी या कंपन्यांनाही तेजीचा लाभ मिळाला. सेसा स्लरलाईट, हिंदाल्को, टाटा मोटर्स, विप्रो यांचे शेअर्स मात्र कोसळले.