Join us

शेअर बाजारात १,८०० कोटींची लबाडी

By admin | Updated: February 21, 2015 03:23 IST

१८०० कोटी रुपयांचा अवाजवी लाभ करून घेणाऱ्या ३३ कंपन्यांवर शेअर बाजारात व्यवहार करण्यास निर्बंध लादले आहेत तर एका कंपनीच्या शेअर्सची बाजारातील खरेदी-विक्री थांबवली आहे.

३३ कंपन्यांना ‘सेबी’चा लगाम : एका कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारावर बंदीमुंंबई : शेअर बाजारात गैरव्यवहार करून कर चुकवणाऱ्यांवर सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) पुन्हा एकदा बडगा उगारला असून स्वत:चा १८०० कोटी रुपयांचा अवाजवी लाभ करून घेणाऱ्या ३३ कंपन्यांवर शेअर बाजारात व्यवहार करण्यास निर्बंध लादले आहेत तर एका कंपनीच्या शेअर्सची बाजारातील खरेदी-विक्री थांबवली आहे.यासंदर्भात सेबीने शुक्रवारी उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार २४ कंपन्यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे तर आणखी नऊ कंपन्यांना कामलक्ष्मी फायनान्स कॉर्प लि. या कंपनीच्या शेअर्सचे व्यवहार करण्यास मनाई केली आहे. याखेरीज कामलक्ष्मी कंपनीच्या शेअर्सचे बाजारातील सर्व व्यवहार, पुढील आदेश होईपर्यंत तहकूब करण्यात आले आहेत. अलीकडच्या काही आठवड्यात सेबीने दिलेला हा चवथा आदेश आहे. या आदेशांचा एकत्रित परिणाम म्हणून सेबीने एकूण २७ कंपन्यांच्या शेअर्सचे व्यवहार थांबवले आहेत. या चारही प्रकरणात मिळून शेअर बाजारात गैरव्यवहार करणाऱ्यांनी स्वत:चा सुमारे २५०० कोटी रुपयांचा अवाजवी लाभ करून घेतला, असा आरोप आहे. ज्यांच्यावर अशी कारवाई झाली आहे त्यात शेअर बाजारात नोंदणी असलेल्या अनेक कंपन्यांचे प्रवर्तक व बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)