Join us

सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसणार

By admin | Updated: June 2, 2014 04:49 IST

आगामी काळात पनवेल शहरात घडणार्‍या सोनसाखळी चोरी, घडफोडी या प्रकाराला आळा बसेल अशी ग्वाही पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांनी दिली.

पनवेल : आगामी काळात पनवेल शहरात घडणार्‍या सोनसाखळी चोरी, घडफोडी या प्रकाराला आळा बसेल अशी ग्वाही पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांनी दिली.सिटीझन युनिटी फोरम (कफ) यांच्या वतीने नुकतीच समन्वय बैठक घेण्यात आली यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला पोलीस आयुक्तांसह, नगराध्यक्षा चारूशीला घरत, कफचे अरूण भिसे, वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त विजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे, मुख्याधिकारी डॉ सुधाकर जगताप उपस्थित होते. शहरात सिटीझन युनिटी फोरम विविध उपक्रम हाती घेऊन ते तडीस नेले जातात. या संस्थेच्या माध्यमातून मीटरप्रमाणे रिक्षाबरोबर अनेक प्रश्न हाती घेण्यात आलेले आहेत. पनवेल परिसरातील महिला, जेष्ठ नागरिकांना मनमोकळेपणाने फिरता यावे, त्यांच्यामध्ये असलेली चोरांची दहशत कमी व्हावी या उद्देशाने कफने पोलीस आयुक्त के.एल प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्या पार्श्वभूमीवर एक समन्वय बैठक बोलाविण्याची सुचना प्रसाद यांनी शिष्टमंडळाला दिली होती. त्यानुसार नुकतीच बैठक पार पडली सोनसाखळी चोरी, घरफोडया, बतावणी करून लुट या प्रकाराला आळा घालण्याची आमची जबाबदारी असल्याचे आयुक्तांनी मान्य केले. पण त्याचबरोबर सर्वांचे सहकार्याबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या. विशेषत: पनवेल शहरातील पदपथावरील अतिक्रमणाबद्दल नाराजी व्यक्त केली. पदपथावरून महिला चालल्या तर सोनसाखळी चोरांना चोरी करता येणार नसल्याचेही ते म्हणाले. पालिकेला आजच्या आज बंदोबस्त देण्यास आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण्यांकडून अतिक्रमण करणार्‍यांना मिळणारे अभय या मुद्द्यावर प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर अधिकार्‍यांना चोरीच्या घटना रोखण्यास अपयश आले तर त्यांच्यावर कारवाईचेही त्यांनी निर्देश दिले. शहरात येणार्‍या अवजड वाहनांमुळे वाहतुक कोंडी होती याबरोबर पोलीसांशी निगडीत असलेल्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. (वार्ताहर)