Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांत्वनपर भेटीतून परिवर्तनाचे पाऊल

By admin | Updated: May 19, 2015 23:03 IST

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी मंगळवारी रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार तथा महाराष्ट्र सरकारचे स्वच्छतादूत डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली.

अलिबाग : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी मंगळवारी रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार तथा महाराष्ट्र सरकारचे स्वच्छतादूत डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी अनितामाई धर्माधिकारी यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर राज्यपाल राव यांनी घेतलेली ही सांत्वनपर भेट राज्यातील सामाजिक परिवर्तनाचे नवे पाऊल ठरणार आहे. या कौटुंबिक भेटीच्या वेळी निरूपणकार सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी आणि प्रकाशभाऊ धर्माधिकारी उपस्थित होते.उभयतांच्या या तीस मिनिटांच्या बैठकीत राज्यपाल राव यांनी अनितामार्इंच्या प्रति आदर व्यक्त करून, डॉ.आप्पासाहेबांच्या वैचारिक नेतृत्वाखाली समर्थ बैठकीच्या माध्यमातून राज्यातच नव्हे तर परराज्यात आणि काही परदेशात सुरू असलेल्या मानवी मनास सुसंस्कारित करण्याच्या अनन्यसाधारण चळवळीची बारकाईने माहिती करून घेतली. मंगळवारी राज्यपाल राव गेटवे आॅफ इंडिया येथून समुद्रमार्गे मांडवा येथे येऊन पुढे आपल्या गाडीतून रेवदंडा येथे जात असताना, रस्त्याच्या दुतर्फा दासभक्तांनी स्वेच्छेने केलेली स्वच्छता आणि केलेले वृक्षारोपण आवर्जून पाहिले आणि डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाचे त्यांनी डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी बोलताना आवर्जून कौतुक केले.समर्थ बैठकीचे वैचारिक अधिष्ठान, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छता विचारांच्या रुजवातीकरिता प्रबोधन आणि डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी या प्रक्रियेचे दृश्य परिणाम आता दिसू लागले असल्याचे सांगितल्यावर राज्यपाल राव यांनी या चळवळीस आपले संपूर्ण सहकार्य राहील, असे सांगितल्याचे ज्येष्ठ निरूपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या भेटीच्या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)