Join us

स्टील मार्केट खड्ड्यांत

By admin | Updated: July 13, 2015 22:41 IST

कळंबोली स्टील मार्केटमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे व्यापारी व वाहतूकदार त्रस्त झाले

कळंबोली : कळंबोली स्टील मार्केटमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे व्यापारी व वाहतूकदार त्रस्त झाले असून, अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने, अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यताही वाढली आहे. सिडकोचे मात्र स्टील मार्केटमधील रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कळंबोली येथील ३0२ हेक्टर जमिनीवर स्टील मार्केटकरिता १२५, २५0, ४५0, ९00 चौ.मी. अशा वेगवेगळ्या आकाराचे १९६0 भूखंड पाडण्यात आले. १९८0 साली सिडकोने भाडेकरार करून लीज तत्त्वावर हे भूखंड व्यापाऱ्यांना दिले. मात्र ठरल्याप्रमाणे फारशा सुविधा देण्यात आल्या नाहीत. भूखंड निर्मितीखेरीज सिडको प्रशासनाने या ठिकाणी काहीही केले नाही. बाजारात आवारातील मुख्य रस्त्यांची निर्मिती, देखभाल व इतर सुविधा देण्याची जबाबदारी सिडकोने पार पाडणे आवश्यक होते. मात्र बाजार समितीकडे बोट दाखवून सिडको आपली जबाबदारी सातत्याने टाळत आहे, तर उत्पन्नाच्या मर्यादेमुळे तसेच चेअरमनपद रिक्त असल्याने बाजार समितीला काम करता येत नव्हते. परिणामी या बाजारपेठेची अतिशय दयनीय अवस्था झाली. गुलाब जगताप यांनी चेअरमनपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर काही प्रमाणात बदलाचे वारे वाहू लागले. त्यांनी सिडकोकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करून काँक्रीटीकरणाचे काम मंजूर करून घेतले. त्यानुसार या मार्केटच्या पेरीफेरी रोडचे काम हाती घेण्यात आले. एकूण ६ कि.मी. रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र मार्केटमधील अंतर्गत रस्ते अक्षरश: खड्ड्यांत गेले आहेत. सिडकोने या रोडवर कधीही डांबर टाकले नाही किंवा त्याची डागडुजी केली नाही.सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये डबकी साचली आहेत. काही ठिकाणी तर तळ्याचे स्वरूप आले आहे. या प्रतिकूल परिस्थितीत व्यापारी त्याचबरोबर वाहतूकदार व्यवसाय करीत आहेत. खड्ड्यात ट्रक, कंटेनरची चाके जावून दररोज अपघात घडतात. त्याचबरोबर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होतेच त्याचबरोबर खड्ड्यांच्या अडथळ्यामुळे मालाची चढ- उतार करण्याकरिताही विलंब लागत असल्याचे वाहनचालक अस्लम शेख याने सांगितले. चारचाकी वाहने आतमध्ये नेताच येत नाहीत कारण अंतर्गत भागात रस्ते नाही तर फक्त खड्डे असल्याचे गुप्ता नावाच्या व्यापाऱ्याने सांगितले. या ठिकाणी नाल्यांचा अभाव असल्याने थोड्या पावसातच चोहीकडे पाणीच पाणी साठते.काही महिन्यांपूर्वी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याकरिता निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र बजेट अतिशय कमी असल्याने त्याला प्रतिसाद मिळाला नाही. याकरिता कमीत कमी दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तो सिडकोने करावा, अशी आमची मागणी आहे.- उत्तम इंदलकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,स्टील मार्केट, कळंबोली.