Join us

चोरीच्या पंचनाम्यानंतर पुन्हा चोरी

By admin | Updated: January 9, 2016 02:56 IST

घरफोडी झालेल्या घराचा पंचनामा होऊन पोलीस तपास सुरू होण्याच्या आत त्याच घरात लुटारूने पुन्हा डल्ला मारल्याची खळबळजनक घटना चेंबूरमध्ये उघडकीस आली

मनीषा म्हात्रे, मुंबईघरफोडी झालेल्या घराचा पंचनामा होऊन पोलीस तपास सुरू होण्याच्या आत त्याच घरात लुटारूने पुन्हा डल्ला मारल्याची खळबळजनक घटना चेंबूरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारुविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील गुलशान बाग परिसरातील हाफिज सय्यद (३०) यांचा इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सय्यद कुटुंबीयांसह बाहेर पडले. ते बाहेर गेल्यावर लुटारूंनी कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. पत्नी आणि मुलांना कुर्ला टर्मिनस येथून सुटणाऱ्या टे्रनमध्ये बसवून तासाभरात सय्यद घरी परतले. चोरी झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तास-दीड तास थांबून पंचनामा केला. घटनास्थळाचा आढावा घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास सय्यदसह तपास पथक पोलीस ठाण्यात परतले.तपास पथक घराबाहेर पडल्यानंतर लुटारूंनी पुन्हा कुलूप तोडून घरात प्रवेश केला. या वेळी पोटमाळ्यावर ठेवलेले पैसे चोरट्यांनी लंपास केले. एकच घर अवघ्या काही तासांत दोनदा फोडल्याने चोरट्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती टिळकनगर पोलिसांनी दिली.