Join us  

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला पाठवलेली कर वसुलीची नोटीस स्थगित, कराची रक्कम कमी करण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 7:13 PM

neelan gorhe : गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला मालमत्ता प्रकरणी आलेल्या नोटीससंदर्भात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे  यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या पिंपरी चिंचवड येथील संस्थेला पाठवलेली करवसुलीबाबतची नोटीस स्थगित करण्यात आली आहे. सोबतच कराची रक्कमही कमी होणार आहे. गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला मालमत्ता प्रकरणी आलेल्या नोटीससंदर्भात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे  यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला गिरीश प्रभुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरविकास विभागाचे उप सचिव सतीश मोघे, ॲड.सतीश गोरडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. (stay to the tax recovery notice sent to padmashree girish prabhune)

गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेने मालमत्ता कर भरला नाही म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने जप्तीची नोटीस पाठविली होती. याबाबत नीलम गोऱ्हे  यांनी तात्काळ मध्यस्थी केल्यानंतर नोटिसाला स्थगिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे गिरीश प्रभुणे यांनी नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड येथील अनुदानित शैक्षणिक संस्थांना कर माफी देण्याबाबत काही निर्णय घेता येईल का, याचा विचार करण्याची सूचना देखील नीलन गोऱ्हे यांनी यावेळी केली आहे. 

निळ्या पूररेषेतून गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेची बांधकामे वगळण्याची सूचना जलसंधारण खात्याला दिली आहे. मुख्य कर जेवढा कमीत कमी आकारता येईल तेवढा कमी कर आकारावा. पुलाच्या बांधकामासाठी एक शाळा पाडली जाणार आहे, त्यासाठी पर्यायी जागा द्यावी. शाळेच्या कामात व्यत्यय येऊ नये यासाठी सर्व परवानग्या पिंपरी चिंचवड महापालिका देणार आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. 

याचबरोबर, पवना नदीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. या पुलाच्या निमित्ताने संस्थेच्या दोन्ही मुख्य जुन्या इमारती पाडाव्या लागणार आहेत. यामुळे होणारी नुकसान भरपाई पिंपरी चिंचवड महापालिका देणार असून संस्थेच्या इमारत बांधण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना नीलम गोऱ्हे यांनी केल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी मान्य करून योग्य कार्यवाही करण्यासाठी आश्वासित केले आहे. 

याशिवाय, पिंपरी चिंचवड येथील गावठाणालगतच्या जमिनीचा समावेश गावठाणात केल्यास संस्था याठिकाणी बांधकाम करू शकेल. या शाळांचा सामाजिक प्रकल्पासाठी नियमानुसार चिंचवड गावठाणात समावेश करावा, असे निवेदन क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी सादर केले.  

टॅग्स :नीलम गो-हेपिंपरी-चिंचवडशिक्षण