Join us  

आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवणार; होणार ३५० फूट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 2:27 AM

पुतळ्याची उंची वाढल्यामुळे ब्राँझ व लोखंडाचे प्रमाण वाढेल. चबुतऱ्याचा पायाही अधिक खोल असेल.

मुंबई : इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आता २५० फुटांऐवजी ३५० फूट उंच असेल. पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती देताना सांगितले की, पुतळ्याचा चबुतरा १०० फूट इतका असेल. त्यावर ३५० फुटांचा पुतळा उभारला जाईल. म्हणजे एकूण उंची ४५० फूट असेल. स्मारकाचे भूमिपूजन १६ आॅगस्ट २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. पाच वर्षांत कामाला गती मिळाली नाही. पण येत्या दोन वर्षांत ते उभारले जाईल.

पुतळ्याची उंची वाढल्यामुळे ब्राँझ व लोखंडाचे प्रमाण वाढेल. चबुतऱ्याचा पायाही अधिक खोल असेल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन ही सोय असेल. तेथील ६८ टक्के जागा हरित असेल आणि ४०० आसनक्षमतेचे ध्यानगृह असेल. तिथे एक हजार आसनक्षमतेचे अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल. या स्मारकासाठी ७०० कोटी रुपयांच्या खर्चास फडणवीस सरकारनेमंजुरी दिली होती. आज मंत्रिमंडळाने १०८९ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता दिली.

राम सुतार यांच्याकडे कामया स्मारकाबाबत आधीच्या सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय या सरकारने कायम ठेवले. एमएमआरडीएच्या माध्यमातूनच स्मारकाची उभारणी केली जाईल. वास्तुविशारद शशी प्रभू हेच असतील, तर शापूर्जी पालनजी समूह या स्मारकाची उभारणी करील. बाबासाहेबांचा पुतळा सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार साकारणार आहेत. या स्मारकाच्या उभारणीसाठी अनेक परवानग्या अद्याप मिळालेल्या नाहीत. त्या सर्व संंबंधित विभागाच्या सचिवांनी येत्या आठ दिवसांत द्याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर