ठाणे : खारी, मुंब्रा, पारिसक येथील खाडीकिनारी १९६० पासून रेतीचा व्यवसाय करणाऱ्या भूमीपुत्रांच्या बांधकामांवर कारवाईच्या नोटीसा जिल्हाधिकारी कार्यालयाने बजावल्या आहेत. त्यामुळे खारी मुंब्रा पारसिक रेती बंदर व्यापारी मंडळाने सोमवारी शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेतीबंदर येथे ठिय्या आंदोलन करुन जिल्हा प्रशासनाचा निषेध केला.स्थानिक भूमिपुत्र व मूळचे शेतकरी असलेले पारसिक, रेतीबंदर, मुंब्रा आणि आसपासच्या परिसरातील रेती व्यावसायिकांच्या प्लॉटवरील बांधकामे पाडण्याच्या नोटीसा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आल्या आहेत. त्या कारवाईला विरोध करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पारसिक रेतीबंदर येथे हे आंदोलन झाले. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात आमदार सुभाष भोईर, आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक उमेश पाटील, मनोज लासे, राजन किणे, राकेश पाटील तसेच रेती व्यावसायिक आर.सी. पाटील, शंकर भोईर, गुरु नाथ पाटील, गणेश पाटील यांच्यासह शेकडो व्यावसायिक यावेळी उपस्थित होते.मुंब्रा पारसिक रेतीबंदर येथे शासनाच्या महसूल अभिलेखानुसार १९६०-६१ पासून भूमिपुत्रांच्या नावे नोंदी आहेत. तसेच मेरीटाईम बोर्डाकडे भाडे भरल्याच्या पावत्याही आहेत. डुबीने रेती काढण्याचा व्यवसाय आणि त्याला जोडधंदा म्हणून रेतीवर पेव्हर ब्लॉक तयार करणे, यावर चालणारे ट्रक आदी वाहनांसाठी गॅरेज तसेच कामगारांसाठी हॉटेल्स आणि वर्कशॉप्स असे अनेक पूरक व्यवसाय येथे सुरु आहेत. असे असतांनाही जिल्हा प्रशासनाने नोटीसा काढून या नागरिकांना देशोधडीला लावण्याचे काम केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल मंत्र्यांना पत्र लिहून या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. तसेच महसूल मंत्र्यांनीही या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)
रेतीबंदर येथे भूमिपुत्रांचे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: April 27, 2015 22:39 IST