Join us

स्टेट सुपरवोटसाठी........मुंबई वार्तापत्र

By admin | Updated: September 26, 2014 21:40 IST

स्टेट सुपरवोटसाठी........मुंबई वार्तापत्र

स्टेट सुपरवोटसाठी........मुंबई वार्तापत्र
...........................................
जे व्हायचे ते आता होऊनच जाऊ दे !
राहुल रनाळकर
मुंबईतील लढती पंचरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आता मुंबई शहरासह उपनगरातील प्रत्येक पक्षाची ताकद किती आहे हे १९ ऑक्टोबरला दिसून येणार आहे. या सगळ्या धामधुमीत सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे खर्‍या लढती किती आणि मैत्रीपूर्ण लढती किती होणार यावरच विधानसभा निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.
मुंबईतील १७ जागा जिंकून काँग्रेसने २००९ मध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. तेव्हा मनसेच्या भूमिकेचा आघाडीला फायदा झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी मात्र ३ जागांपुढे जाऊ शकली नाही. यंदा १७ पैकी किती मतदारसंघात राष्ट्रवादीचे तुल्यबळ उमेदवार उभे राहतात, यावर मुंबईचे चित्र प्रामुख्याने अवलंबून असेल. काँग्रेसने विद्यमान १७ आमदारांपैकी १५ आमदारांना पहिल्या यादीत तिकीटे दिलेली आहेत. काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची फारशी वाढ गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत झालेली नाही. पण तरीदेखील काँग्रेसच्या काही मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा डोळा होता. त्यामुळे काँग्रेसचे तगडे उमेदवार असलेल्या बालेकिल्ल्यांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कोण? हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या असलेले मतदारसंघ वाचवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. आहेत त्यात भर घालणार की हातातले गमावण्याची वेळ येणार हे १९ ऑक्टोबरलाच स्पष्ट होईल. तर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचेही उमेदवार असणार आहे. अणुशक्तीनगरमधून लढणारे नवाब मलिक, वरळीतून लढणारे सचिन अहिर आणि कुर्ल्यातून रिंगणात असलेले मिलिंद कांबळे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे तगडे उमेदवार मैदानात असतील का? यावर या मतदार संघांमधील चित्र अवलंबून असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांमध्ये जशी विभागणी होणार तशीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मतांची विभागणी ही शिवसेना-भाजप-मनसे यांच्या उमेदवारांमध्ये होणार आहे. सरकारविरोधी लाटेतील मतांमधील होणारी विभागणी हा मुंबईतील महत्त्वाचा फॅक्टर ठरेल.
सध्या शिवसेना-भाजप आणि मनसे यांच्यापुरता विचार केला तर मनसेची ताकद सर्वाधिक आहे. मनसेचे मुंबईत ६ आमदार आहेत. त्यात मागाठाण्यातील प्रवीण दरेकर, विक्रोळीत मंगेश सांगळे, भांडुप पश्चिमेतील शिशीर शिंदे, माहिमध्ये नितीन सरदेसाई आणि शिवडीत बाळा नांदगावकर. पैकी घाटकोपर पश्चिमेतील राम कदम यांनी यापूर्वीच भाजपमध्ये उडी घेतली आहे. तर शिवडीची जागा मनसेने पहिल्या यादीत जाहीर केलेली नाही. उर्वरीत ४ आमदारांना मनसेने पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, मनसेविरुद्ध या सहाही ठिकाणी शिवसेनेसह भाजपचे उमेदवार रिंगणात असतील. तसेच शिवसेनेचे देखील सध्या चार आमदार आहेत. पैकी दहिसरचे विनोद घोसाळकर, जोगेश्वरीचे रवींद्र वायकर, गोरेगावमधील सुभाष देसाई आणि वांद्रे पूर्वेतील प्रकाश (बाळा) सावंत या विद्यमान आमदारांविरुद्ध मनसे आणि भाजपचे उमेदवार असतील. तर भाजपचे बोरीवलीतील उमेदवार विनोद तावडे, मुलुंडमधील सरदार तारासिंग, चारकोपमधील योगेश सागर, घाटकोपर पूर्वेतील प्रकाश मेहता आणि मलबार हिलमधील मंगलप्रभात लोढा या विद्यमान आमदारांविरुद्ध शिवसेना आणि मनसेचे उमेदवार रिंगणात असतील. त्यामुळे आपापले मतदारसंघ वाचवण्याचे गणित करण्यात या उमेदवारांची चांगलीच कसरत होणार आहे.
खरे उमेदवार आणि डमी उमेदवार
मैत्रीपूर्ण लढतींचे समीकरण सर्वच मतदारसंघांमध्ये मुलभूत ठरेल. युती आणि आघाडीच्या वाट्याला पूर्वी जे-जे मतदारसंघ होते. तेथे त्यांच्या सहयोगी पक्षाची फारशी वाढ ही झालीच नाही. त्यामुळे आता पूर्वीच्या मित्रांसमोर उमेदवार देताना सर्वच पक्षांना कसरत करावी लागणार आहे. उमेदवारांची ही निवड जिंकण्यासाठीची असेल की जुन्या मित्रपक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठीची हे पाहणेही उत्सुकतेचे आहे. त्यामुळे काही ठिकाणी छुप्या पद्धतीने मैत्रीपूर्ण लढती रंगण्याची शक्यता आहे. त्यात पुन्हा अशा छुप्या मैत्रीपूर्ण लढतींमध्ये मुख्य प्रतिस्पर्ध्याला खिंडार पाडू शकेल, अशा उमेदवारांना देखील प्राधान्य दिले जाणार हे स्पष्ट आहे.
आघाडीपेक्षाही खरी काट्याची लढत ही शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्येच होण्याची शक्यता अधिक आहे. या दोन्ही पक्षांतील धुसफूसणार्‍या संघर्षाला मोकळी वाट मिळाल्याने ते एकमेकांविरुद्ध अधिक विखारी प्रचार करत रिंगणात उतरतील. तिच स्थिती काँग्रेस-राष्ट्रवादीची आहे. धर्मनिरपेक्ष मतांमधील फूट कशी रोखणार, हा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप हा निवडणुकीतील सर्वाधिक प्रभावी मुद्दा असेल. वोटबँक हा फॅक्टरही यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल. पूर्वी पाडापाडी ही पडद्यामागून व्हायची, ती आता थेट होणार त्यामुळे नेत्यांचे खरे रंग देखील जनतेला कळणार आहेत. जे काय व्हायचे ते एकदा होऊनच जाऊ दे, अशीच भावना सध्या मतदारांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे.
..............................................

मुंबईतील सध्याचे चित्र

एकूण जागा ३६
काँग्रेस - १७ आमदार
मनसे - ६ आमदार
भाजप- ५ आमदार
शिवसेना- ४ आमदार
राष्ट्रवादी - ३ आमदार
समाजवादी पार्टी- १ आमदार
...................................................