Join us  

राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने ‘लोकमत’चा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 5:02 AM

पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणाऱ्या २०१८ सालच्या राज्यस्तरीय व विभागीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली

मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणाऱ्या २०१८ सालच्या राज्यस्तरीय व विभागीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली असून या पुरस्कारांत लोकमतने बाजी मारली आहे. ‘लोकमत समाचार’चे दिनेश मुडे यांना राज्यस्तरावरील बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) घोषित झाला आहे. तर, राज्यस्तरावरील तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कारासाठी ‘लोकमत’चे प्रशांत खरोटे यांची निवड झाली आहे. कोल्हापूर विभागाच्या ग. गो. जाधव पुरस्कारासाठी ‘लोकमत’च्या इंदुमती गणेश (सूर्यवंशी) यांची तर नागपूर विभागाच्या ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कारासाठी ‘लोकमत’चे योगेश पांडे यांची निवड करण्यात आली आहे.प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. तर, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव तर यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार जाहीर झाला आहे.तसेच माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना दिला जाणारा शासकीय गटातील यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) मंत्रालयातील विभागीय संपर्क अधिकारी डॉ. सुरेखा मधुकर मुळे यांना जाहीर झाला आहे.२७ जुलै रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी ४ वाजता होणाºया समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.