लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरी पूर्व सीप्झ येथील राज्य विमा कामगार निगम रुग्णालयातील परिचारिकांचा संप सुरुच आहे. या संपाचा सातवा दिवस आहे. संपामुळे रुग्णालयात शुकशुकाट असून रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. शनिवारपासून सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे तर येथील संपूर्ण कामकाज कोलमडले आहे. याप्रकरणी येथील परिचारिका आणि व्यवस्थापन यांच्यातील वाद मिटवण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी पुढाकार घेण्याची मागणी रुग्णांकडून करण्यात आली आहे.येथील ३५० खाटाचे हे रुग्णालय असून येथील १३० परिचरिका या संपावर आहेत राज्यातून औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणारे सुमारे २५० ते ३५० कामगार विमा योजनेंतर्गत येथे उपचारासाठी येतात. सध्या येथे १३० पैकी फक्त ६ ते ७ नर्सेस कामावर आहेत. अतिदक्षता विभागासह अन्यविभाग देखील बंद असल्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे.येथील कामगार संघटनेला न विचारता परस्पर नर्सेस युनियनचे उपाध्यक्ष कैलास डायल यांची अचानक औरंगाबाद येथे बदली केल्यामुळे व्यवस्थापनविरुद्ध कामगार संघटना यातील वाद विकोपाला गेला असल्यामुळे येथील १३० परिचारिका संपावर गेल्या आहेत. याप्रकरणी येथील वैद्यकीय अधिकारी श्रीमती आभा जैन यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
राज्य विमा कामगार रुग्णालयातील परिचारिकांचा संप अद्यापही सुरूच
By admin | Updated: June 27, 2017 03:42 IST