Join us
Daily Top 2Weekly Top 5

शर्जील उस्मानीला राज्य सरकारचा आश्रय; भाजपचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एल्गार परिषदेत ‘हिंदू सडा हुआ है’ असे आक्षेपार्ह वक्तव्य करुन हिंदू धर्मियांच्या भावना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एल्गार परिषदेत ‘हिंदू सडा हुआ है’ असे आक्षेपार्ह वक्तव्य करुन हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या शर्जील उस्मानीलाही आता हे महाविकास आघाडी सरकार आपल्या छत्रछायेखाली घेऊन विशेष वागणूक देत आहे. उस्मानीचे वक्तव्य गंभीर स्वरुपातील असूनही कठोर कलमाखाली गुन्हा का दाखल केला जात नाही, असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.

भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत उपाध्ये म्हणाले की, सत्तेत आल्यापासून सर्व प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपींना संरक्षण द्यायचे, हीच या सरकारची भूमिका राहिल्याचे वारंवार पाहायला मिळते आहे. त्यामुळेच शर्जील उस्मानीने तपासात सहकार्य केल्यास कठोर कारवाई करणार नाही, असे स्पष्ट आश्वासन पुणे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिले. उस्मानीच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्य सरकारने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने त्याच्यावर एफआयआर दाखल करण्याची हिंमत दाखविली नाही. भाजप युवा मोर्चाने आंदोलन केल्यावर एफआयआर दाखल केला. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भादंविनुसार २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. मात्र, त्याच्याविरुद्ध केवळ सामाजिक भावना दुखावणे, यासंदर्भातील १५३ अ चे सौम्य कलम लावले. उस्मानीने त्याच्या भाषणात घटनेचाही अवमान केला. कायद्यानुसार अशा कृत्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाणे अपेक्षित होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने राज्य घटनेचा अपमानही मुकाट गिळला.

विधिमंडळ अधिवेशनात ‘पाताळातूनही शर्जील उस्मानीला खेचून आणू’, अशी गर्जना करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता गप्प का आहेत, तपासात पोलिसांना सहकार्य करणाऱ्या अशा किती गुन्हेगारांना पोलिसांनी संरक्षण दिले आहे, हेही सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.

......................